एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अनेकजणांना सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येतात. पण हा त्रास होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हा त्रास नेमका का होतोय ? हे जाणून घेतलं तर त्यावर उपाय करणं सोप्प होतं.
नाक आणि तोंडातून फुफ्फुसातील हवा स्फोटकापणे बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेला आपण शिंक म्हणतो. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. थंड पाणी किंवा थंड हवा, तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, खूप धूळ, तीव्र वास आणि वेळप्रसंगी काही जंतू अशा गोष्टींच्या संपर्कात आल्यावर आपल्याला शिंका येतात. या गोष्टींमधील सूक्ष्म कण नाकात जाऊन त्यांचा नाकाच्या आतील अस्तरासारख्या आवरणाशी (म्यूकस मेंब्रेन) संपर्क होतो. त्यातून ते आवरण उद्दीपित होतं.
या गोष्टीचा संदेश मेंदूकडे जातो. मेंदूच्या मुळाशी (ब्रेन स्टेम) असलेल्या शिंका नियंत्रित करणाऱ्या केंद्राकडे हा संदेश जातो. तिथून छातीच्या स्नायूंना प्रसारण पावून मोठा श्वास घेण्याची आणि घशाच्या स्नायूंना शिथिल होण्याची आज्ञा दिली जाते आणि शिंक येते.
हे कण जास्त असल्यास नाकातल्या आवरणातून पातळ द्रव पदार्थ सर्दीच्या रूपानं स्रवतो. शिंकेवाटे बाहेर फेकल्या न गेलेल्या कणांना, या द्रवामध्ये सामावून घेतलं जातं आणि श्वासमार्गातून पुढे जाण्यास अटकाव होतो. हे कण किंवा जंतू नाकातून श्वासमार्गावाटे फुफ्फुसात गेल्यास न्यूमोनिया, श्वासनलिकेचा दाह असे घातक आजार होऊ शकतात.
शिंकेच्या क्रियेमुळे हे शरीराला धोकादायक कण आणि जंतू बाहेर फेकले जातात. त्यामुळे शिंक ही आजाराचे लक्षण नाही, तर शरीराचं संरक्षण करणारी एक क्रिया आहे, हे ध्यानात घ्यायला हवं.
सतत येणार्या शिंका तुम्हांला भविष्यात सर्दीचा त्रास होतोय याचे संकेत देतात. त्यामुळे अचानक शिंकांचा त्रास होत असेल आणि वातावरणात थंडावा, अचानक बदल झाला नसेल तर सर्दी होणार असल्याचा इशारा वेळीच ओळखा.
अचानक थंड वातावरणातून उष्ण वातावरणात गेल्यास शिंकांचा त्रास होऊ शकतो. अनेकदा एसी रूममधून बाहेर पडल्यास हा त्रास होऊ शकतो. वातावरणात चटकन झालेल्या बदलामुळे शिंकांचा त्रास होतो.
तुमच्या अवतीभवती धुम्रपान करणारी व्यक्ती असेल तर तर सिगारेटच्या धुरामुळेही तुम्हांला त्रास होऊ शकतो. सिगारेटचा धूर नाकाला त्रासदायक ठरतो. त्यामउळे सतत सिगारेट पिण्याची इच्छा होणारी व्यक्ती तुमच्या आसपास असेल तर तुम्हांला सतत शिंका येऊ शकतात.
सिझनल अॅलर्जीमुळेदेखील खोकला, शिंका, डोळे लाल होणं असा त्रास होतो. अशावेळेस तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(कोरा या संकेतस्थळावर संकेत यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Post a Comment