अनेक आजारांवर बहुगुणी अडुळसा आहे उपयुक्त; पाहा फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिरवा आणि लाल अडुळसा असे याचे दोन प्रकार आहेत. साधारण ३०० मिमी पावसाच्या प्रदेशात लाल अडुळसा आढळतो. पानांची चव कडू असते. याचा उपयोग मुख्यत्वे कफ कमी करण्यासाठी होतो. संस्कृतमध्ये याला ‘वासा’ म्हणून संबोधतात. बाजारात मिळणारे वासा सिरप खोकल्यावर अतिशय गुणकारी असते. अडुळशाच्या पानांचा उपयोग औषधाप्रमाणेच खत म्हणूनही होतो. शिंपी पक्षी याची दोन पाने शिवून घरटे बांधतात. अडुळशाच्या पांढऱ्या फुलांच्या तळाशी मध असतो. त्यामुळे मधमाशांना या झाडाचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होतो.

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अडुळशाच्या रसात मध आणि पिंपळी यांचे चाटण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वासाचा विकार बरा होण्यास मदत होते. श्वास लागणे कमी होते. तसेच नाकातून अथावा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा उपयुक्त ठरतो. १० मि. लि. अडुळशाचा रस तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते.

अडुळसा कफनाशक आहे. अडुळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्या असता छातीतील कफ पातळ होऊन दमेकरी मनुष्यास फार सुखावह वाटते. क्षयरोगावर औषध करताना काढ्यात अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा (सुमारे तीन ग्रॅम) घालून पाव लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा. हा काढा क्षयरोगावर उत्तम समजला जातो. क्षय झाला असता अडुळशाचा अवलेह देतात.

आडुळशाची लागवड कशी केली जाते
अडुळशाची लागवड फांदीपासून करतात. याचे कोवळे शेंडे लवकर रुजतात. लावताना पाने देठापासून कापावीत. जी फांदी लावायची आहे, तिला किमान दोन गाठी असणे आवश्यक आहे. एक गाठ मातीत आणि दुसरी मातीच्या वर राहील, अशा पद्धतीने फांदी लावावी. मातीतील गाठीतून मुळे आणि वरील गाठीतून कोंब फुटतात. हवेत आद्र्रता असताना म्हणजे जून-जुलैमध्ये छाट कलम जास्त चांगले रुजते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post