'त्या' पाच नगरपालिकांतून 'एमआयएम'ही ताकद आजमावणार

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

खा. असेदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने पाच जागा जिंकल्याने राज्यभरातील एमआयएम समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. महाराष्ट्रातील यापुढील सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात नगर जिल्ह्यात होणाऱ्या पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव व अकोले या पाच नगरपालिकांच्या निवडणुकातही एमआयएम ताकद आजमावणार आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी यांनी नगर येथे नुकत्याच घेतलेल्या समर्थकांच्या बैठकीत यादृष्टीने तयारी सुरू करण्याचे आदेश जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

डॉ. कादरी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. नगरमध्ये त्यांनी एमआयएमच्या कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी समन्वयक सोहल जलील, जिल्हा महासचिव जावेद शेख, कारी अब्दुल कदीर, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, शहराध्यक्ष सरफराज जहागीरदार, विद्यार्थी शहराध्यक्ष अमीर खान, सनाउल्लाह तांबटकर, इरफान शेख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक लढवणार असल्याचे डॉ. कादरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राबरोबरच बिहारमध्येही एमआयएम पक्षाचे 5 आमदार निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. बिहारचा विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे. ज्याप्रमाणे बिहारमध्ये आम्हाला यश आले आहे; त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना समोर जाण्याची तयारी एमआयएमने केली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच नगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार असल्याने यामध्ये समविचारी पक्षाला एकत्र घेऊन पूर्ण ताकदीने निवडणुका लढू व यासाठी औरंगाबाद येथून जी मदत लागेल, ती पूर्ण देण्याचीही ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाध्यक्ष डॉ. अशरफी यांनी नगर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांसंदर्भात माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post