एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अकोले तालुक्यात ऐन दिवाळीत गरीब आदिवासी, मागास, वंचित, शोषित, अंध, अपंग, विधवा व मजुरांना रेशनचे धान्य व साखर मिळाली नसल्याने त्यांची दिवाळी कडूच गेली. त्यांना रेशन मिळाले नाही हे दस्तूरखुद्द ४० रेशन पुरवठादार यांनीच अकोल्याच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन खंत व्यक्त केली व दिवाळीआधी आम्हाला रेशन पुरवठा झाला नसल्याने आम्ही त्या गरीबांना रेशन दिवाळीत देऊ शकलो नाही, असा खेदही व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर रेशन पुरवठ्यातील झारीतील शुक्राचार्य कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकाराच्या चौकशीची मागणी अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे.
अकोले तालुक्यातील कुमशेत, केळुंगण, एकदरे, शेरणखेल, कोलतेंभे, चंदगीरवाडी, शेंडी, साकीरवाडी, शेलविहिरे, शिंगणवाडी, आंबाडा, लावीत, डोंगरगाव, देवठाण आदी ४० गावात दिवाळीपूर्वी रेशन पोचलेच नाही, त्यामुळे रेशनधारकांना धान्य उपलब्ध झाले नसल्याचे अकोले तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणपत भांगरे यांच्यासह सदस्य बन्सी अस्वले, भास्कर बुळे, मुरलीधर सुपे आदी चाळीस दुकानदारांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
अकोले तालुका अतिदुर्गम आहे. त्यात कोरोना महामारीमुळे रोजगार नाही व मजुरी नसल्याने हातात सणासुदीला पैसे नाही. कुणी मजुरी देत नाही. अशा वेळी महागाचे धान्य व साखर घेणे परवडत नाही. त्यात सरकारी धान्य स्वस्त दारात मिळेल म्हणून रेशनची वाट पाहणारी दारिद्र्य रेषेखाली माणसे दिवाळीत वाट पाहून थकली मात्र धान्य मिळाले नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर, कष्टकरी आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना बसला आहे. पेठेवाडी ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून तहसीलदार कचेरीवर ठिय्या आंदोलन केल्यावर त्यांना धान्य मिळाले. मग आता प्रत्येक गावांनी धान्यासाठी मोर्चे काढायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे. नियोजनाचा अभाव, वाहतूक ठेकेदार पुढारी असल्याने हम करेसो कायदा उक्तीप्रमाणे सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यात रेशनचे धान्य गरीब शोषित व्यक्तींना मिळत नसून दिवाळीत चाळीस गावात धान्य पोहचले नाही. मग पुरवठा अधिकारी करतात काय? यात कुणाचे हितसंबंध गुंतले असेल तर आपण हा विषय वरिष्ठ पातळीवर नेऊ व जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार आहोत, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.
Post a Comment