मनपा कर्मचारीही संपात सहभागी; साफसफाईचे कामही राहणार बंद

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कामगार कायद्यातील बदलांविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात महापालिकेचे कामगारही सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी कामगार युनियन संलग्न असून, संघाने या संदर्भात मनपाला रितसर नोटीस दिलेली आहे. पाणीपुरवठा, अग्निशमन व दवाखाने आदी कर्मचारी वगळता सफाई कामगारांसह सर्व कामगारांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव कॉ.आनंदराव वायकर यांनी केले आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांविरोधात देशभरातील कामगार आक्रमक झाले आहेत. विविध कामगार संघटनांनी आज (दि.26) देशव्यापी संप पुकारलेला आहे. राज्यातील महापालिकांमधील कामगार युनियन या महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी संलग्न आहेत. श्रमिक संघाने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. संघाचे सचिव उदय भट यांनी नगर महापालिकेला तशी नोटीस बजावलेली आहे. पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन व्यवस्था व दवाखान्यांमधील कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. सफाई कामगारही संपात असल्याने शहरातील स्वच्छतेचे कामकाजही बंद राहणार आहे. सर्व कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन कॉ.अनंत लोखंडे व कॉ.आनंदराव वायकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post