बिबट्याचा वाढलेला त्रास मला विरोध केल्याने; आमदार पाचपुते यांचा दावा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वाढलेला त्रास हा त्यावेळी मला जिल्ह्यातील राजकारण्यांनी राजकीय हेतूने विरोध केल्याने होत आहे, असा आरोप माजी वनमंत्री व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी येथे केला. ८ वर्षांपूर्वी २०१२मध्ये मी वनमंत्री असताना श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे बिबट्या रेस्क्यु सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न केले होते, पण हे काम मी करतो म्हणून त्यावेळी जिल्ह्यातील राजकारण्यांनी मला विरोध केला होता. त्यामुळे ते रेस्क्यु सेंटर बारगळले. त्याचा परिणाम आता बिबट्याचा उपद्रव भयानक वाढला आहे. त्यावेळी मला विरोध करणारेच त्याला जबाबदार आहेत, असा दावाही पाचपुते यांनी केला. दरम्यान, निसर्ग संवर्धनासाठी वाघ-सिंह जगले पाहिजे व वाढले पाहिजे, पण नरभक्षक बिबट्यांना मारले पाहिजे, त्यांना दयामाया दाखवता कामा नये, अशीही मागणी त्यांनी आवर्जून केली.

भाजपच्या जिल्हा बैठकीनिमित्त नगरला आलेल्या आ. पाचपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील बिबट्यांच्या उपद्रवाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात बिबट्या ही मोठी समस्या झाली आहे. ग्रामीण भागात उसाच्या शेतीमुळे त्यांना लपण्यास जागा मिळत आहे व दुसरीकडे निसर्गातील त्यांचे अन्न कमी होत चालल्याने ते मानवी वस्तीकडे येऊन कुत्रा-शेळी-गाय-बैल यांच्यावर हल्ले करता करता आता माणसांवर व लहान मुलांना आपले भक्ष्य करीत आहेत व अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे यावर कायम स्वरुपी उपाय शोधला गेला पाहिजे. नरभक्षक बिबट्य़ांना मारलेच पाहिजे तसेच जिल्ह्यात बिबट्या रेस्क्यु सेंटर व बिबट्या सफारीसारखे प्रकल्प राबवले पाहिजे, असे सांगून आ. पाचपुते म्हणाले, भविष्यात बिबट्याची समस्या वाढणार असल्याने २०१२मध्ये मी बेलवंडीचा बिबट्या रेस्क्यु प्रकल्प प्रस्तावित केला होता. बिबटे पकडून त्यांना जंगलात सोडले जाणार होते. पण केवळ हे काम मी करतो व माझ्यामुळे ते होते, या राजकीय विचारांतून त्यावेळी त्याला व मला विरोध केला गेला. त्याचा परिणाम आता बिबट्याचा त्रास आणखी वाढण्यात झाला आहे. त्यामुळे किमान आता तरी जिल्ह्यातील राजकारण्यांनी या बिबट्या समस्येचा गांभीर्याने विचार करण्याचे व त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post