'नॅक' हॅटट्रीकसाठी सारडा करणार मार्गदर्शन; समन्वयकपदी नियुक्ती

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

येथील पेमराज सारडा महाविद्यालयाने याआधी दोनवेळा नॅकचे मानांकन मिळवले असून, त्यावेळी मार्गदर्शक असलेले ज्येष्ठ नेते ब्रिजलाल सारडा यांच्या मार्गदर्शनाखालीच पुन्हा नॅक मानांकन मिळवून अनोखी हॅटट्रीक साधण्याची तयारी महाविद्यालयाने केली आहे. हिंद सेवा मंडळाने ब्रिजलाल सारडा यांनाच आता पुन्हा नॅक समिती समन्वयकपदाची जबाबदारी देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा महाविद्यालयाला नॅक मानांकन मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाला नॅकचे ए मानांकन पुन्हा मिळण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्यावतीने माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांची संस्थेच्या समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंडळाचे मानद सचिव संजय जोशी व सारडा महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. अनंत फडणीस यांनी नियुक्तीचे पत्र सारडा यांना दिले. यावेळी अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, अशोक उपाध्ये, मधुसूदन सारडा, अनिल देशमुख, मकरंद खेर, जगदीश झालानी, आदिक जोशी, सचिन मुळे, नूतन प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, अनंत देसाई, बी.यू.कुलकर्णी, प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, डॉ.सुजय कुमावत उपस्थित होते. यावेळी जोशी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयाने चौफेर प्रगती करीत यापूर्वी दोनदा नॅकचे ए मानांकन मिळवले आहे. त्यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन असलेले ब्रिजलाल सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे नॅक मानांकन प्राप्त झाले होते. आता येत्या २०२१ मध्ये सारडा महाविद्यालात पुन्हा नॅक कमिटी येणार आहे. त्यामुळे यावेळीही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष मोडक म्हणाले, एखाद्या महाविद्यालयास नॅक मानांकन मिळणे ही अभिमानाची बाब असते. सारडा महाविद्यालयाने हा बहुमान दोनवेळेस मिळवला आहे. आता पुन्हा येत्या वर्षात हे मानांकन मिळवणार आहोत. यासाठी सारडा यांच्यासारख्या अनुभवी समन्वयकांची नियुक्ती मंडळाने केली आहे. या नियुक्तीबद्दल सारडा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या जडणघडणीत सारडा कुटुंबियांचे सुरुवातीपासून योगदान आहे. त्यामुळे हिंद सेवा मंडळाने दिलेली जबाबदारी कर्तव्याच्या भावनेतून स्वीकारून पुन्हा महाविद्यालयाच्या शिरपेचात नॅक मानांकनचा तुरा रोवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post