'महाविकास'ची वर्षपूर्ती : काँग्रेसने खिलवले पेढे.. शिवसेना-राष्ट्रवादीकडून मात्र दुर्लक्ष

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद शहर काँग्रेसने एकमेकांना व नागरिकांना पेढे खिलवून साजरा केला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरमधील समर्थकांनी आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याकडून असा वर्षपूर्तीचा कोणताही कार्यक्रम झाल्याचे ऐकिवात नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावले व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कमपणे राज्यात काम करीत आहे. हे सरकार जनतेच्या मनातील सरकार असल्यामुळे आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांची भाषणे झाली. काँग्रेस पक्षाचे चाणक्य म्हणून ओळख असणारे राष्ट्रीय नेते अहमदभाई पटेल तसेच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. आभार मुबिन शेख यांनी मानले. यावेळी डॉ.रिजवान अहमद, डॉ.दिलीप बागल, सय्यद खलील, नलिनीताई गायकवाड, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष अक्षय कुलट, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेसचे चिरंजीव गाढवे, प्रमोद अबुज, अमित भांड, यश भोंगे, जाहिद अखतार, इम्रानभाई बागवान, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, महेश लोंढे, प्रशांत जाधव, संकेत लोकरे, मयुर सोनवणे, केतन खरपुडे, सागर बोराडे, गोपाल नायडू, आदित्य यादव, मनोज उंदरे, मयूर सोनवणे, आदित्य यादव, महेश लोंढे, अमित मोमीन, अभिजीत कुलकर्णी उपस्थित होते.

भाजपवर टीका
यावेळी भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. भाजपने महाविकास आघाडी सरकार अकरा दिवसात कोसळेल, तीन महिन्यात कोसळेल अशा वल्गना केल्या. परंतु सरकार काही कोसळले नाही. उलट कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटावर देखील या सरकारने जनसहभागातून यशस्वीरीत्या कोरोनावर जवळपास मात करीत राज्याच्या विकासाचा गाडा विस्कळीत होऊ दिला नाही, असे प्रतिपादन यावेळी काळे यांनी केले.

थोरातांच्या अभिनंदनाचा ठराव
यावेळी डॉ. अहमद यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे खंबीर नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला खलील सय्यद यांनी अनुमोदन दिले. सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

Post a Comment

Previous Post Next Post