मनपा कर्मचार्यांची दिवाळी खूषीत; सानुग्रह मंजूर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महापालिकेच्या सुमारे अठराशे कर्मचाऱ्यांची दिवाळी करोना काळातही खूषीत जाणार आहे. मनपा कामगार संघटना व मनपा प्रशासनात मंगळवारी करार होऊन यंदाच्या दिवाळीसाठी ७ हजाराचे सानुग्रह अनुदान व साडेबारा हजाराचा दिवाळी सण अग्रीम निश्चित करण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा पगाराची आहे. शासनाने या महिन्याचे जीएसटी अनुदान दिवाळीपूर्वी महापालिकेला दिले तर, मग मनपा कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने सोने पे सुहागा ठरणार आहे.

यंदा कोरोनामुळे मनपा संकलित कराची वसुलीही कमी झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार की नाही, याचा प्रश्न होता. मात्र, मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सचिव आनंद वायकर यांनी मागच्या आठवड्यातच मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याशी सानुग्रह अनुदान व सण अग्रीमबाबत प्राथमिक चर्चा केली होती. या चर्चेची अंतिम फेरी मंगळवारी झाली. आयुक्त मायकलवार यांच्यासह उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, प्रशासन विभागा प्रमुख मेहेर लहारे यांच्यासह कामगार संघटनेकडून लोखंडे व वायकर यांच्यासह आयुब शेख, बाबा मुदगल, बलराज गायकवाड, अकिल शेख, गुलाब गाडे, विठ्ठल उमाप आदी सहभागी झाले होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मनपा प्रशासन व कामगार संघटनेमध्ये करारही करण्यात आला. या कराराची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासूनच मनपा कर्मचाऱ्यांमध्ये खुषीचे वातावरण पसरले होते.

दोन टप्प्यात देणार
मनपा कर्मचाऱ्यांना मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ७ हजाराचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. मात्र, त्यातील ५ हजाराचा पहिला टप्पा दिवाळी पूर्वी व राहिलेली २ हजाराची रक्कम डिसेंबरमध्ये मनपाच्या संकलित कर वसुलीनंतर दिला जाणार आहे. मनपाने नुकतीच नोव्हेंबर महिन्यासाठी शास्तीमाफी योजना जाहीर केली असल्याने व त्यामुळे वसुलीला थोडा वेगही आला असल्याने पुरेशी वसुली झाली तर अनुदानाचा दुसरा हप्ता आणखी लवकर मिळण्याची शक्यता आहे. तसेच मनपाद्वारे दिवाळी-ईद सण अग्रीम दिला जातो. तसा यंदाच्या दिवाळीतही मनपा कर्मचाऱ्यांना साडेबारा हजाराचे सण अग्रीम दिले जाणार आहे. यासाठीचे १ कोटी रुपये बँकेत लगेच वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तसेच सानुग्रह अनुदानाचे पैसे येत्या दोन-तीन दिवसात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचेही नियोजन असल्याचे सांगण्यात आले. मनपा प्रशासनाने यंदाच्या बजेटमध्येच २ कोटीची तरतूद सानुग्रह अनुदानासाठी केली होती व मनपा महासभेने तिला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे ही रक्कम वर्ग होण्यास आता अडचण राहिली नसल्याचे सांगितले जाते. सण अग्रीमचे साडेबारा हजार रुपये पुढील १० महिन्यात समान हप्त्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केले जाणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून महापालिकेला सुमारे साडेसात कोटीचे जीएसटी अनुदान दर महिन्याला येते. यातून कर्मचाऱ्यांचे पगार व निवृत्तीवेतन अदा केले जाते. या महिन्याचे असे अनुदान अजून आलेले नाही. ते दिवाळी पूर्वी आले तर दिवाळीआधीच कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तांचे निवृत्तीवेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन असल्याचेही सांगण्यात आले. एकूणच कोरोना काळातही मनपा कर्मचाऱ्यांमध्ये सध्या खुषीचे वातावरण आहे. मनपाची दिवाळी यंदा जोरात होण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post