'त्या' ६० कोटीतून मनपाला छदामही आला नाही; महापौर-आयुक्तांचे स्पष्टीकरण


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 
नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केंद्र सरकारने नगर जिल्ह्याला कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी तब्बल ६० कोटी रुपये दिल्याचा दावा केला असला तरी या पैशांतून महापालिकेला कोविड नियंत्रणासाठी एक छदामही आला नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या ६० कोटीपैकी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला नेमके किती व महापालिका क्षेत्राला नेमके किती पैसे मिळाले, हे अजून अनुत्तरीतच आहे. दरम्यान, राज्य सरकारने कोविड नियंत्रणासाठी महापालिकेला काहीही पैसे दिलेले नाहीत. आपत्कालिन निधी व एनएचयुम योजना तसेच १४व्या वित्त आयोगातील शिल्लक निधी मिळून सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चाची अनुमती दिली आहे व त्यापैकी आतापर्यंत सुमारे अडीच कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयुक्त मायकलवार यांनी दिली.

खा.विखे यांनी मध्यंतरी जाहीर सभेत बोलताना केंद्र सरकारने ६० कोटी रुपये नगर जिल्ह्याला दिले असून, यातून कोविड नियंत्रण व उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मध्यंतरी, त्यांनीही केंद्र सरकारने जिल्ह्याला दिलेल्या कोविड निधीतून झालेल्या खर्चाचा हिशेब जिल्हा प्रशासनाला मागितला होता. तसेच हा निधी केंद्र सरकारचा असल्याने तो खर्च करताना केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून संबंधित खासदारांना विश्वासात घेण्याचीही मागणी केली होती. पण जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या दोन्ही मागण्यांना जवळपास वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. या पार्श्वभूमीवर त्यांना आता जिल्ह्याला केंद्राकडून ६० कोटीचा निधी दिल्याचा दावा केला असल्याने या पैशांतून जिल्ह्यात नेमका कशासाठी व किती खर्च झाला, याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौर व आयुक्तांनी महापालिकेला यातून एक पैसाही मिळाला नसल्याचा दावा केल्याने नेमके हे पैसे कोठे खर्च झाले, याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने आपत्कालीन निधीतून सुमारे १२ लाख, एनएचयुएम निधीतून २ कोटी व १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून २ कोटी ६४ लाख खर्चाची मुभा महापालिकेला दिली आहे. यातून कोविड टेस्टींग कीट व अन्य अनुषंगिक मिळून आतापर्यंत सुमारे अडीच कोटीचा खर्च झाल्याची माहिती आयुक्त मायकलवार यांनी दिली.

प्रत्यक्ष कारवाईच्यावेळी 'ती' नावे जाहीर करणार
कोरोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा उपचार बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना सात दिवसात संबंधित रुग्णांच्या बँक खात्यावर वाढीव आकारलेले पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत, ते त्यांनी जमा केले नाही तर त्यांची नावे जाहीर केली जातील व त्यांच्याकडील या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या वाढीव उपचार बिलांबाबत संबंधित खासगी रुग्णालयांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असल्याने महापालिकेकडून आता अंतिम कारवाई सुरू असली तरी रुग्णांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक रुग्णालयांचे प्रमुखांनी अशा वसुलीला विरोध केला आहे व मनपाचा आदेश त्यांनी अमान्य केला आहे. मात्र, त्यांना सात दिवसांची मुदत रुग्णांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी दिली असून, पैसे जमा केल्याचे बँक स्टेटमेंट मनपाकडे जमा करण्याचेही सांगितले आहे. तसे ते मुदतीत आले नाही तर संबंधित रुग्णालयांची नावे जाहीर केली जातील व त्यांच्याकडील या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल, असेही मायकलवार यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post