नोव्हेंबरमध्ये 'शास्तीमाफी'; डिसेंबरपासून जप्ती कारवाई


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 
ऐन दिवाळीच्या काळात महापालिकेने संकलित कर थकबाकीदारांना खूषखबर दिली आहे. या थकबाकीदारांकडे असलेल्या १०२ कोटीच्या शास्तीमध्ये (दंड रक्कम) चक्क ७५ टक्के म्हणजे जवळपास ७६ कोटीची माफी महापालिकेने देऊ केली आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत म्हणजे महिनाभर ही योजना लागू राहणार आहे. त्यानंतर १ डिसेंबरपासून थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मालमत्ता जप्तीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचेही नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. मनपा महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शास्तीमाफीची मागणी केली असल्याने व महापौर
बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निर्णय घेण्याचे आदेश सभेत दिले होते. त्यानूसार आयुक्तांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच या ७५ टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. सलग सट्टी असल्याने त्याची अधिकृत घोषणा सोमवारी महापौर वाकळे व आयुक्त मायकलवार यांनी संयुक्तपणे केली. 

यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, स्‍थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर, नगरसेवक डॉ.सागर बोरूडे, मनोज दुलम तसेच समद खान, विलास ताठे, उदय कराळे, प्रभारी उपायुक्‍त संतोष लांडगे उपस्थित होते.

महापालिकेची संकलित कराची मागील थकबाकी १९४ कोटी आहे. यात मूळ टॅक्स ९२ कोटी व शास्ती रक्कम १०२ कोटीची आहे. याशिवाय या आर्थिक वर्षाची चालू मागणी ४५ कोटीची आहे. मागील एप्रिलपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत संकलित कराची १५ कोटी ५० लाखाची वसुली झाली आहे. ही वसुली वाढण्य़ासाठी मागील थकबाकीतील १०२ कोटीच्या शास्ती रकमेत ७५ टक्के माफी महापालिकेने देऊ केली आहे. या माफीमुळे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होत नसल्याचा दावा आयुक्त मायकलवार यांनी केला. प्रामाणिक करदात्यांनी संकलित कराची रक्कम भरताना त्यांना ८ ते १० टक्के सवलत दिली गेली आहे. तसेच आता थकबाकीदारांना शास्ती रकमेत ७५ टक्के माफी दिली असल्याने राहिलेली २५ टक्के शास्ती तसेच मूळ टॅक्सची रक्कम त्यांच्याकडून वसूल होणार आहे तसेच त्यांना प्रामाणिक करदात्यांना दिली जाणारी १० टक्के सवलतही मिळणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

१६ हजारावर थकबाकीदार टार्गेट
२५ हजार ते १ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या १३ हजार मालमत्ताधारकांकडे ५८ कोटी तर १ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या साडेतीन हजारावर थकबाकीदारांकडे १०२ कोटीची, अशी दोन्ही मिळून साडेसोळा हजारावर थकबाकीदारांकडे १६० कोटीची थकबाकी असून, शास्ती माफीच्या योजनेत या वसुलीचे टार्गेट ठेवले गेले आहे. मनपाचे अधिकारी व कर्मचारी या थकबाकीदारांकडे जाऊन त्यांना शास्तीमाफीचा लाभ घेण्यासाठी पैसे भरण्याचे आवाहन करणार आहेत. त्यास प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर १ डिसेंबरपासून वसुलीची कडक कारवाई केली जाणार असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. शास्तीमाफी योजना लागू केल्यानंतर दर आठवड्याला वसुलीचा आढावा घेतला जाणार असून, २० नोव्हेंबरपासून थकबाकीदारांवर कारवाईचे नियोजन सुरू केले जाणार असल्याचे आय़ुक्त मायकलवार यांनी सांगितले.

'त्यांना' टार्गेट नाही...तर विनंती..
महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या आग्रही मागणीनुसार मनपा प्रशासनाने शास्तीमाफीचा निर्णय घेतला असला तरी आता प्रत्यक्षातील शास्ती वसुलीसाठी नगरसेवकांना कोणतेही टार्गेट दिलेले नाही. फक्त त्यांना थकबाकीदारांकडील वसुलीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. विविध प्रभागांतील बड्या थकबाकीदारांकडील वसुलीसाठी नगरसेवकांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे आयुक्त मायकलवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post