उजळले दत्तक्षेत्र.. ३ हजार पणत्यांचा नगरमध्ये दीपोत्सव

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगरमधील प्रसिद्धी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी स्थापन केलेल्या वेदांतनगर दत्तक्षेत्र तब्बल ३ हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघाले. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त येथे दीपोत्सव करण्यात आला. यानिमित्ताने दत्त दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी झाली होती.

त्रिपुरी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी सुरू केली आहे. ही परंपरा देवस्थानमधील विश्वस्त मंडळ, कर्मचारी, सत्संग मंडळ आणि भाविकांनी जतन केली आहे. यानिमित्ताने रविवारी श्रीदत्तक्षेत्रामधील भगवान श्री दत्तात्रेय मंदिरामध्ये सायंकाळची आरती ७ वाजता सुरू झाल्यावर काही वेळातच उपस्थित स्त्री-पुरूषांनी दीपप्रज्वलन करण्यास सुरुवात केली. श्रीदत्तक्षेत्रमधील मंदिरासह परिसरात तेलाच्या तीन हजार पणत्यांची आकर्षक पध्दतीने मांडणी करण्यात आली होती. रांगोळ्यांची रेखाटने करताना त्यावर तेलाच्या पणत्यांची मांडणी कलात्मकतेने करण्यात आली. स्वस्तिकसारखी मांगल्याची प्रतिके दिव्यांनी तेजोमय होतानाचा क्षण डोळ्यात साठविण्याचा आनंद भाविकांनी घेतला. मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक पध्दतीने रोषणाईही करण्यात आली होती. श्रीदत्तक्षेत्रमध्ये आरतीचे स्वर निनादत असतानाच मंदिराचा परिसर तेवणा-या पणत्यांच्या सात्विक प्रकाशाने उजळून निघाला.

नगरमधील मनमाड महामार्गावरील प्रेमदान चौकालगत वेदांतनगर श्रीदत्तक्षेत्र आहे. या देवस्थानचे महाराष्ट्रासह देशभरात भाविकभक्त आहेत. अनेक नामवंत संगीत कलावंत दरवर्षी येथे येऊन आपली संगीत व कला सेवा अर्पण करतात. येथे त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव उत्साही व भक्तिपूर्ण वातावरणात झाला. सामाजिक अंतराचे भान ठेवत व आवश्यक ती काळजी घेऊन भाविक दर्शनाचा आनंद घेत होते.

Post a Comment

Previous Post Next Post