मंत्री मुंडेंकडून वीजबिल सवलतीचे सुतोवाच; फडणवीसांना दिला इशारा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

६४ आमदारांचा नेता मुख्यमंत्री होतो, ५४ आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो व ४४ आमदारांचे मंत्री होतात तर १०५ आमदारांचा विरोधी पक्ष नेता होतो, हा लोकशाहीचा नवा प्रयोग व चित्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाला दाखवून दिले आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल भाष्य केले. वीज बिल सवलतीचा निर्णय सरकारचा आहे व तो लवकरच घेतला जाणार आहे, असे सुतोवाचही त्यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री असताना त्यांनी (विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस) यांनी कितीजणांना धमक्या दिल्या, याच्या ऑडियो व व्हीडीओ क्लीप आम्ही बाहेर काढायच्या का, अशा शब्दात भाजपला इशाराही दिला.

मंत्री मुंडे शनिवारी शासकीय विश्रामगृहावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगरचे आमदार संग्राम जगताप, तसेच नगरसेवक कुमारसिंह वाकळे, बाळासाहेब जगताप व अन्य उपस्थित होते. वर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटात जनतेचे आरोग्य सांभाळले व विकासाची सांगडही घातली, असा दावाही त्यांनी केला. सरकार मजबूत आहे व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय या सरकारने घेतला तसेच नियमित कर्जफेड करणारांनाही लाभ दिला गेला. केंद्र सरकारने राज्याच्या हक्काचा असलेल्या जीएसटीचा पैसा मात्र पूर्णपणे दिलेला नाही, असे मुंडे यांनी सांगितले. मात्र, त्यामुळे राज्यातील विकासकामांवर परिणाम झाला व आर्थिक निर्बंध निर्माण झाले. त्यामुळे विकासाची गती मंदावली.

फडणवीसांना इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगल्या संस्कारातून वाढलेले आहेत, ते धमक्या देतात, हे आम्ही कधीही पाहिलेले नाही, पण एखादी व्यक्ती कोणत्याही अर्थाने बदनाम होत नाही, हे दिसले तर त्याला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची स्ट्रॅटेजी भाजपची आहे. विरोधी पक्ष नेते जेव्हा सीएम धमक्या देतात असे म्हणतात, त्यावेळी तुम्ही सीएम असताना अनेकांना धमक्या दिल्या आहेत व अनेकांनी त्याच्या ऑडिओ- व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत, त्या आता आम्हाला काढायला लावू नका, अशा शब्दात मुंडे यांनी फडणवीस यांना इशारा दिला. आम्ही कितीही चांगले काम केले तरी विरोधी पक्ष हा विरोधासाठी विरोध करीत राहणार आहे, असा टोलाही मुंडे यांनी लगावून, सरकार पडण्याची ते वाट बघत आहेत, पण मुंगेरीलाल के हसीन सपने सारखी यांची अवस्था झाली आहे, असे ते म्हणाले. भाजपची ताकद किती आहे हे सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. भाजपाला गाडणार हे वक्तव्य मी केलेच आहे व त्यावर मी ठाम आहे. भाजपचा या निवडणुकीत पराभव होणार हे यातून मला सांगायचे होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना, त्यांना सरकारमध्ये काहीच माहित नाही आणि ते बाहेर वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत व या सर्व गोष्टींना माध्यमेसुद्धा बळी पडतात अशी खंतही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांना स्थगिती या शब्दाचा अर्थ कळला तर चांगले होईल, अशा सूचक शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post