फटाके फुटले.. नगरला दीपोत्सव उत्साहात

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्याच्या स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तर नगरच्या स्तरावर शहराचे प्रथम नागरिक महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यंदाच्या दिवाळीत फटाके उडवू नका व प्रदूषण करू नका, असे आवाहन केले होते. ते कमी म्हणून की काय, अनेक ठिकाणी फटाके उडवायचे नाहीत म्हणून सामूदायिक शपथ उपक्रम झाले. विविध पर्यावरण प्रेमी व सामाजिक संस्थांनीही आवाहने केली होती. पण ती सारी धुडकावून नगरमध्ये दिवाळी फटाके उडवून उत्साहात साजरी झाली. अर्थात यंदा फटाक्यांचा दणदणाट तसा कमीच होता, असे जेव्हा अनेकांच्या चर्चेत आले, तेव्हा ते फटाकेमुक्तीचे आवाहन करणारांचेच यश म्हणायला हरकत नाही.

यंदाचा दीपोत्सव अवघा दोन दिवसांचा आहे. शनिवारी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन उत्साहात झाल्यावर आता वेध पाडवा व भाऊबीजेचे लागले आहेत. हे दोन्ही सण सोमवारी (१६ नोव्हेंबर) आहेत. त्यानंतर दिवाळी संपल्यात जमा होणार आहे. पुढे तुळशी विवाहाची लगबग असेल तर दीपोत्सवाचा उत्साह हळूहळू कमी होत जाणार आहे. यंदा कोरोनामुळे सारेच सणवार साधेपणाने व घरातल्या घरात झाले. नोकरी-व्यवसायांतील निर्बंध व अडचणीमुळे बाजारात पैसाही फारसा उपलब्ध नव्हता. तरी वर्षाचा सण म्हणून दिवाळी साजरी झालीच. कोरोनाचे सोशल डिस्टन्सिंग व मास्कचे निर्बंध डावलून अनेकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी मागील ८-१० दिवसांपासून कापड बाजारात गर्दी केली होती. मागील ९-१० महिन्यांपासून मंदीत चाललेल्या व्यवसायांना यामुळे तरतरी आली. गर्दी एवढी होती की, सतत वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यात शहरातील रस्ते पावसामुळे खड्डेयुक्त व धुळ युक्त झाले असताना व महापालिकेकडून त्यांच्या दुरुस्तीबद्दल फारसे गांभीर्य नसतानाही खड्ड्यांतील रस्त्याने जा-ये करीत व धुळीने माखत अनेकांनी खरेदी केली.

शहरात तसेच सावेडीत व मार्केट यार्ड, कल्याण रोड, केडगाव येथे फटाके स्टॉल्स होते. दिवाळीपूर्वी येथे उत्साह होता. पण फटाकेमुक्ती व प्रदूषण मुक्तीची आवाहने होऊ लागली, तसे या बाजारात अस्वस्थता होती. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झडले. विशेष म्हणजे फटाके स्टॉल्सची उदघाटनेही याच काळात राजकीय नेते मंडळींनीच केली. अशा स्थितीत लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी शहरभर फटाक्यांचा दणदणाट झाला, आकाशात सप्तरंगी भुईनळे उडाली आणि फटाकेमुक्तीची राजकीय आवाहने नगरकरांनी धुडकावल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट असतानाही त्याचा मागमूस दिवाळीच्या उत्साहात दिसला नाही. शनिवारी घर, वाहने व लक्ष्मीपूजन-संपत्तीपूजन (ऐश्वर्यपूजन) झाले व आता पाडव्यानिमित्तची सोने खरेदी, वाहन खरेदी, नवीन गृहप्रवेश तसेच घरगुती साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात बाजारपेठेत आर्थिक चैतन्य राहण्याचा एकमेव राहिलेला दिवस म्हणजे दिवाळी पाडवा उत्साहात साजरा होण्यासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post