यु ट्यूब-फेसबुकवर यंदा सूरमयी दिवाळी पहाट


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दरवर्षी पुण्या-मुंबईच्या कलारसिकांसारखी सूरमयी संगीताच्या साथीत नगरकर कलारसिकांची दिवाळी पहाट तब्बल आठवडाभर सूरमयी होते. पण यंदा कोरोनाने प्रत्यक्ष कार्यक्रमांवर निर्बंध आणले असले तरी संगीत साधक व संगीतप्रेमींनी हार मानलेली नाही. यंदा नगरकरांना फेसबुक व यु ट्यूबवर दिवाळी पहाट कार्यक्रमांचा आनंद येत्या तीन-चार दिवसात घेता येणार आहे. शनिवार (१४ नोव्हेंबर), रविवार (१५ नोव्हेंबर) व सोमवार (१६ नोव्हेंबर) असे सलग तीन दिवस सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान विविध संस्थांद्वारे फेसबुक व यु ट्यूबवर लाईव्ह दिवाळी पहाट सूरमयी संगीत मैफिलींचा आनंद लुटता येणार आहे.

दिवाळीच्या काळात पुण्या-मुंबईत नामवंत गायक कलावंतांचे दिवाळी पहाट कार्यक्रम होतात. त्यातूनच आदर्श घेत नगरमधील विविध सांस्कृतिक व संगीत संस्थांनीही नगरला सूरमयी दिवाळी पहाट उपक्रमांचे मागील १०-१२ वर्षांपासून आयोजन सुरू केले आहे. हिंदी-मराठीतील नामवंत गायक-गायिकांच्या या मैफिली बहारदार होतात. नगरकर रसिकांकडून दाद मिळवून जातात. यंदा मात्र कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास निर्बंध असल्याने तसेच कोरोना संसर्गाचा धोका कोणालाही होऊ नये म्हणून विविध संस्थांनी यंदा त्यांचे दिवाळी संगीत कार्यक्रम यु ट्यूब व फेसबुकवर लाईव्ह आयोजित केले आहेत. संगीत रसिकांना या लाईव्ह कार्यक्रमांच्या लिंक मागील दोन-तीन दिवसांपासून व्हॉटसअॅपवर पाठवल्या जात आहेत. रसिकांकडूनही त्याला लाईक प्रतिसादासह मोबाईलवर कार्यक्रमाचा आनंद घेण्याची ग्वाही दिली जात आहे.

नगरमध्ये दरवर्षी सरगमप्रेमी मित्रमंडळ, श्रुती संगीत निकेतन, बंदिश संस्था, कलारसिक डॉक्टर मंडळींचा सप्तसूर ग्रुप, चैतन्य फाउंडेशन, शब्दयात्री, आशीर्वाद ग्रुप, संस्कार भारती अशा विविध संस्था दिवाळी पहाट मैफिलींतून मराठी-हिंदी गाणी, नाट्य प्रयोग, नाट्य प्रवेशासारखे कार्यक्रम करतात. यंदा कोरोनामुळे सरगमप्रेमी मित्रमंडळ, चैतन्य फाउंडेशन, बंदिश, आशीर्वाद ग्रुप या संस्थांनी प्रत्यक्ष वा फेसबुक-यु ट्यूबवरही कार्यक्रम करणे टाळले आहे. पण अन्य संस्थांनी आपल्या मैफिलींची माहिती सोशल मिडियातून व्हायरल केली आहे. श्रुती संगीत निकेतनद्वारे शनिवारी (१४ नोव्हेंबर) बालदिन व दिवाळी नरक चतुर्दशी असा दुहेरी योग सार्थकी लावत सकाळी ७ वाजता संस्थेच्या फेसबुक पेजवर लहान मुलांचा कलाविष्कार आयोजित केला आहे. यात मुलांचे गायन, वादन, वक्तृत्व, नृत्य व अन्य कला सादरीकरण होणार आहे. श्रुती संगीत निकेतनने लहान मुलांचे संगीत सौभद्र नाटक बसवले असून, त्यातील काही भागाचे सादरीकरणही यात होणार आहे. तसेच शब्दयात्री संस्थेची दिवाळी पहाट मैफल याच दिवशी सकाळी ७ वाजता संस्थेच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखवली जाणार आहे. तर श्रुती संगीत निकेतनद्वारे नगरचे ज्येष्ठ साहित्यिक व लोककलेचे अभ्यासक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अगस्ती ऋषींवर संगीत नाटक लिहिले असून, तेही श्रुती संगीत निकेतनद्वारे बसवले गेले आहे, त्याचे फेसबुकवर लाईव्ह सादरीकरण रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता होणार आहे. डॉक्टरांच्या सप्तसूर ग्रुपच्या मराठी संगीत मैफिलीचे सादरीकरण याच दिवशी सकाळी ७ वाजता यु ट्यूबवर सप्तसूर पेजद्वारे होणार आहे. तर संस्कार भारतीद्वारे राम रंगी रंगले ही संगीत मैफल सोमवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता संस्कार भारतीच्या फेसबुक पेजवर होणार आहे. या विविध संगीत कार्यक्रमांच्या निमित्ताने संगीत रसिक नगरकरांना घरबसल्या हिंदी-मराठी गीतांची मेजवानी मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post