सहाशेवर अनाथ मुलांना अभ्यंगस्नान; स्नेहालयमध्ये शुक्रवारी आयोजन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळीनिमित्त पहाटेचे अभ्यंगस्नान घरोघरी होणार असले तरी असा आनंद अनाथ व निराधार मुलांनाही मिळणार आहे. एमआयडीसीतील स्नेहालय संस्थेने शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता 'स्पर्श वात्सल्याचा' उपक्रम आयोजित केला असून, यात स्नेहालयमधील सहाशेवर मुलांचे सुगंधी तेलाने मालिश करून व उटणे लावून अभ्यंगस्नान करवले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नगरकरांना करण्यात आले आहे.

अनाथ किंवा बालकाश्रमात राहणाऱ्या व स्वतःचे घर आणि कुटुंब गमावलेल्या बालकांना प्रेमाची आणि वात्सल्याच्या स्पर्शाची भूक असते. त्यामुळेच स्नेहालय पुनर्वसन संकुलात स्पर्श वात्सल्याचा उपक्रम दरवर्षी दिवाळीत राबवला जातो. मागील वर्षीपासून हा उपक्रम सार्वजनिक स्वरूपात सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. यंदाचा उपक्रम शुक्रवारी (दि. १३) रोजी एमआयडीसीतील संस्थेच्या मनसुखलालजी मुथा सभागृहात सकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. या उपक्रमात सुगंधी खोबरेल तेलाने सर्व मुलांच्या शरीराची मालीश कार्यकर्ते व नागरिक करणार आहेत.

यानिमित्ताने संस्थेतील स्पर्श वंचित बालकांना या उपक्रमाने मायेचा स्पर्श मिळणार असल्याने या उपक्रमात सहभागाचे आवाहन नागरिकांना स्नेहालय परिवारातील उपक्रम संयोजक समाधान धालगुडे आणि बेबीताई केंगार यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या अनुषंगिक साहित्याची सोय संस्थेने केली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 9011026493 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post