जिल्ह्यात राष्ट्रवादी-भाजप संघर्ष रंगणार-पाच नगरपालिकांच्या लवकरच निवडणुका


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली असली तरी या वर्षभरात कोरोनामुळे या तीन पक्षांच्या सरकारला कोणत्याही निवडणुकीत शक्तीप्रदर्शनाची संधी मिळालेली नाही. पण आता ही संधी येऊ घातली आहे. नगर जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुका येत्या एक-दोन महिन्यात होऊ घातल्या असून, या पाचही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व भाजप असा सामना रंगणार आहे. या सामन्यात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

राज्यस्तरीय राजकारणाचा विचार करून हे दोन पक्ष राज्यातील मित्रपक्ष राष्ट्रवादीला साथ देणार की स्थानिक स्तरावर भाजपशी हातमिळवणी करणार, हा कळीचा मुद्दा राहणार आहे. दरम्यान, पाचपैकी तीन नगरपालिकांच्या आरक्षण सोडती झाल्या असून, त्यांच्यासह प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले नगर पंचायत, कर्जत नगरपंचायत व पारनेर नगरपंचायत या प्रत्येकी १७ जागा असलेल्या तीनही नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरअखेरीस वा नववर्षाच्या प्रारंभी होण्याची शक्यता आहे. या तिन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही नगरपंचायती महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र लढवणार की केवळ राष्ट्रवादीच स्वतंत्रपणे उतरणार,हा उत्सुकतेचा विषय झाला आहे. या तिन्ही नगरपंचायती भाजप मात्र एकटाच स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. पण स्थानिक राजकारणाचा विचार करून भाजप महाविकास आघाडीतील सेना व काँग्रेसला साथीला घेतो काय, हाही राजकीय खेळीचा व कुतूहलाचा विषय होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शेवगाव व जामखेड नगरपरिषदांच्या निवडणुका जानेवारीच्या शेवटी वा फेब्रुवारी २०२१मध्ये अपेक्षित आहेत. या दोन्ही नगरपरिषदांमध्ये नगरसेवक संख्या प्रत्येकी २१ आहे. त्यांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. या दोन्ही तालुक्यांपैकी शेवगावमध्ये भाजपचा तर जामखेडला राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे त्यांचे आपल्या मतदारसंघातील या नगरपरिषदांवर वर्चस्व ठेवण्याचे प्रयत्न असणार आहेत.

कोरोनामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता पाच नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. या पाचही नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरील संघर्ष दिसणार आहे. किंबहुना, आतापासूनच तो सुरू झाला आहे. त्यामुळे या पाचही निवडणुका राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, रोहित पवार व निलेश लंके तसेच भाजपच्या आमदार मोनिका राजळे या चारही आमदारांची राजकीय ताकद पणाला लावणाऱ्या ठरणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post