प्रतिज्ञापत्राद्वारे खोटी माहिती? नेवाशात घडला प्रकार, कारवाईची मागणी

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक नेवासे तालुक्यात घडली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सरकार दरबारी दिलेली माहिती खरी असल्याचे भासवून तहसीलदारांसमोर शंभर रुपयांच्या दस्तऐवजावर (स्टॅम्प) प्रतिज्ञापत्र करून माहिती खरी असल्याचे भासवले जात आहे. पण दिलेली माहिती खोटी ठरल्यास भारतीय दंड विधान कलम १९९ व २०० नुसार फौजदारी कारवाई केली जाते. मात्र, अशी कारवाई झाल्याचे फारसे ऐकिवात नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीच्या खरे-खोटेपणाचे गुपित कायम राहत आहे.

यासंदर्भातील माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील मौजे खरवंडी (ता.नेवासा) येथील वारस हक्काचे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र खोटे व चुकीचे असल्याने ते रद्द करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गोरक्षनाथ साळूंखे यांनी नेवासा तहसीलदारांना दिले आहे. दाखल प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देवून खरी माहिती लपवून ठेवल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे यावर तहसीलदार काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मौजे खरवंडी येथील जमिनीच्या वारसहक्काचे प्रतिज्ञापत्र तहसीलदारांसमोर दिले असून, ते खोटे असल्याचा दावा साळुंके यांनी केला आहे. जिवंत व कुटुंबातील व्यक्ती प्रतिज्ञापत्रातून गायब केले गेले आहे व त्याचे पुरावे नेवासा तहसीलदारांकडे दिल्याचे साळूंखे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच खरी माहिती लपवून ठेवून खोटी माहिती देणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनात केली आहे. दरम्यान, अनेक सरकारी कामे करून घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिले जाते. पण तहसील कार्यालयात आपले काम भागवून घेण्यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर माहिती सादर करताना प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खरी की खोटी, याची खातरजमा कोणीही करीत नसल्याचे सांगितले जाते. मात्र, यातून आपले काम भागवून शासनाची फसवणूक केली जात असल्याने तहसीलदारांनी खोटी माहिती सादर करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाईचा बडगा उगारून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक करणारांना धडा शिकवण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post