बळीराजांनी पाठवली पंतप्रधान मोदींना हजारो पत्रे; केल्या 'या' मागण्या


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केंद्र सरकारने राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसान मदतीत भरीव वाढ करावी, पीक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करावी, पीक विमा योजना शेतकऱ्यांना न्याय देणारी बनविण्यासाठी पावले उचलावीत, यासह विविध मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नगर जिल्ह्यातून हजारो पत्रे पाठवण्यात आली आहेत. 

किसान सभेच्यावतीने लेटर टू पी.एम. मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाला. या पत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधारभावाचे कायदेशीर संरक्षण द्यावे, किमान आधारभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून व्यवस्था उभारावी, शेतकऱ्यांची देशव्यापी कर्जमुक्ती करण्यासाठी केंद्रीय स्तरावर योजना करावी, सर्व शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांना व्यापार व तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे, कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, आदिवासी व वन निवासींना विस्थापित करणाऱ्या जाचक इको सेन्सिटिव्ह धोरणात बदल करावेत, आदिवासी व वन निवासींना विस्थापित न करता त्यांच्या रास्त व न्याय्य विकासाची हमी देत वन्य प्राणी व मानव यांच्या सहजीवनाच्या तत्वाला केंद्रस्थानी मानत जैववैविध्य रक्षणाचे व पर्यावरण रक्षणाचे धोरण आखावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरण्यासाठी पंतप्रधानांना मोदींना पत्र लिहून या लेटर टू पी.एम. मोहिमेत हजारो शेतकरी सहभागी झाले. 

तालुका व गाव स्तरावर शेतकऱ्यांनी लिहिलेली पत्रे पोस्टपेटीत टाकण्यासाठी किसान सभेच्यावतीने मिरवणुका काढण्यात आल्या. पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करीत ही पत्रे पोस्टाच्या पत्रपेटीत टाकण्यात आली. केंद्र सरकारने आपली शेतकरी विरोधी धोरणे तातडीने मागे घ्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अकोले येथे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, जुबेदा मणियार, कैलास वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मिरवणूक काढून पोस्टात पत्रे टाकण्यात आली. या आंदोलनात राज्यातील 21 जिल्ह्यांमधून हजारो पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात आल्याचे किसान सभेकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post