'त्या' पंचनाम्यांसाठी आदेशाची प्रतीक्षा; शेतकरी अस्वस्थ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर तालुक्यातील फळबागांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास कृषी व महसूल प्रशासनाला वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. एका दिवसात 65% पर्जन्यवृष्टी झाली तरच नुकसान भरपाई मिळते असे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत आम्ही फळबागा पंचनामे करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मात्र, त्यामुळे फळबागा धारक शेतकऱी अस्वस्थ व रडवेले झाले आहेत.यंदा झालेल्या अतिवृष्टीने कामरगाव (तालुका नगर) येथील संत्रा पिकाच्या फळबागांवरील अपरिपक्व फळे जमीनदोस्त झाली असून झाडांवर एकही फळ शिल्लक राहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांचे पंचनामे करण्याचे महसूल व कृषी विभाग टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पंचनाम्यांस होत असलेला विलंब पाहून जनाधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हाध्यक्ष अंकुश ठोकळ, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नगर येथे येऊन अप्पर तहसीलदार गणेश पवार यांना लेखी निवेदन दिले.

फळबागांचे पंचनामे करण्यात विलंब झाला तर तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी गणेश पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची मागणी रास्त असून कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील. त्यामुळे आता त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, चालू खरीप हंगामातील मूग, बाजरी,कांदा, फुल शेती यांचे नुकसान होऊनही पंचनामे झालेले नाहीत. शासनाने मोठे पॅकेज जाहीर करूनही नियमावर बोट ठेवून अधिकारी पंचनामे करण्यास दिरंगाई करीत आहे. पंचनामे करण्याबाबत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ही महसूल विभागाशी संपर्क साधलेला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी बबन भुजबळ, मारुती आंधळे, हबीब शेख, वजीर सय्यद, गणेश निमसे, किरण जावळे. अमित गांधी, हर्षदा एडके, गौरव बोरकर, अंकुश शिर्के, शहनवाज शेख आदी उपस्थित होते. येत्या आठ दिवसात पंचनामे न झाल्यास शेतकरी मुला-बाळांसमवेत तहसील कार्यालय पुढे आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post