अखेर उड्डाणपुलासाठी प्रस्तावित कामे होणार सुरु; वाहतूक बायपासवरून वळवणार

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगरच्या बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम अखेर प्रत्यक्षात सुरू होत आहे. हे काम सुरू होणार असल्याने नगर-पुणे महामार्गावर नगर शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बाह्यवळण मार्गावरून (बायपास) वळवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.
नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक महवितरण कंपनीकडून लाईटची कामे सुरू असल्याने सर्वप्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरील बाह्यवळण मार्गावरून वळवण्याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिले आहे.

नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या ३ किलोमीटरच्या अंतरात केंद्र सरकारच्या सुमारे ३०० कोटीच्या निधीतून उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. याअनुषंगाने महावितरण कंपनीकडून वीज खांब हलवणे व अन्य लाईटची कामे ठेकेदाराला देण्यात आली आहेत. सध्या दिवाळीचा उत्सव असल्यामुळे नगर-पुणे रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच महावितरणला विजेचे काम करावे लागत आहे. तसेच नगर शहरातील बाजारपेठेत माल उतरवण्यासाठी अवजड वाहने शहरात आणली जातात. त्यासाठी वाहनांना वेळ निश्चित करून दिलेली आहे. अवजड वाहनांमुळे लाईटच्या कामामध्ये अपघात होवून कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता निर्माण होवू नये म्हणून हे आदेश बजावले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नव्या आदेशानुसार बीड-सोलापूर-दौंड-पुणे-औरंगाबाद-मनमाड मार्गे जाणारी अवजड वाहतूक ही वाळूंज बायपास-अरणगाव बायपास-केडगाव बायपास मार्गे जाईल तर औरंगाबाद-मनमाडकडून पुणे-दौंडकडे जाणारी वाहतूक ही शेंडी बायपास-केडगाव-अरणगाव-वाळुंज बायपासवरून जाईल, असे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post