गौरी गडाखांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट; जिल्ह्याचे राजकीय विश्व अस्वस्थ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले जात असलेले ज्येष्ठ नेते व साहित्यिक-माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या धाकट्या सूनबाई गौरी प्रशांत गडाख (वय ३८) यांनी शनिवारी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांनी आत्महत्या का केली, कौटुंबिक कारणाने केली की अन्य काही कारणाने, याचे गुढ कायम आहे. दरम्यान, सोनई येथे रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गडाख परिवारावर कोसळलेल्या या आघाताविषयी उपस्थितांमधून दुःख व हळहळ व्यक्त होत होती.

गौरी गडाख या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रशांत गडाख यांच्या पत्नी होत्या. या दाम्पत्याचा विवाह २००१मध्ये झाला होता व त्यांना शालेय शिक्षण घेत असलेल्या दोन मुली आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गौरी या धाकट्या भावजयी आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात गडाख परिवार प्रसिद्ध आहे. खासदारकी व आमदारकी भूषवल्यानंतर साहित्य क्षेत्रात विविध पुस्तके लिहून लौकिक मिळवलेल्या यशवंतराव गडाख यांच्या कुटुंबातील महिलेने आत्महत्या करण्याच्या घटनेने जिल्ह्याचे राजकीय विश्व हादरून गेले आहे. गडाखांचे नातेसंबंध संगमनेरचे मंत्री बाळासाहेब थोरात व पाथर्डीचे माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या परिवाराशी आहेत. यामुळे जिल्ह्याचे राजकीय विश्व अस्वस्थ आहे. या पार्श्वभूमीवर, गौरी यांच्या आत्महत्येचे कारण नेमके काय आहे, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी दुपारी त्यांनी स्वतःला संपवल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणाला काही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडूनही आक्षेप घेतला गेल्याचे बोलले जात होते. पण त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. गौरी यांचे माहेर राहाता तालुक्यातील लोणी येथील आहे. त्यांचे वडील वसंतराव विखे हे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नातेसंबंधातील असल्याचे सांगितले जाते.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
नगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी गौरी यांनी गळफास घेतल्यामुळे मृत्यु झाल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता गौरी यांच्या आत्महत्येच्या कारणाचे गुढ उकलले जाणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. शनिवारी गौरी यांच्या मृत्यूची माहिती कळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी नगरमधील यशवंत कॉलनीतील गडाखांच्या घरी तातडीने पोहोचले. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात गौरी यांना नेण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथे स्पष्ट झाले. त्यानंतर औरंगाबाद येथे त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टेम करण्यात आले व रविवारी दुपारी सोनईला वांबोरी रस्त्यालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गौरी यांचे पुतणे उदयन गडाख यांनी मुखाग्नि दिला. यावेळी राज्याचे मृद आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, डॉ. सुभाष देवढे, प्रशांत गडाख, विजय गडाख, सुनील गडाख, नगरचे आ. संग्राम जगताप आदींसह गडाखांचे नातेवाईक, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी तीनच्या सुमारास गौरी यांचे पार्थिव औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातून सोनईत आल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या अंत्यविधीसाठी लोणी परिसरातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा तालुक्यातून गडाख कुटुंबियांवर प्रेम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. गौरी यांच्या आकस्मिक निधनाने सोनईवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आठवडे बाजार वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली होती. अंत्यसंस्कार ठिकाणाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. दरम्यान, गौरी यांच्या निधनाने जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नव्हत्या. मात्र, पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा सामाजिक कार्यात हातभार होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे दुःख व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post