राज्यपाल नियुक्त आमदार : 'त्या' तिन्ही नावांवर फुली? नगरचा राजकीय भ्रमनिरास

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

होणार होणार म्हणून मागील महिनाभरापासून गाजावाजा सुरू असताना व सोशल मिडियातूनही जोरदार मार्केटिंग सुरू असताना अखेर जिल्ह्यातील 'त्या' तिन्ही नावांवर मुंबईतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चक्क फुली मारल्याचे आता तरी दिसत आहे. बहुचर्चित राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संभाव्य नावांमध्ये नगर जिल्ह्यातील कोणतेही नाव नाही, असे सध्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष राज्यपालांकडून ज्यावेळी अधिकृतपणे ही नावे जाहीर होतील, तेव्हाच नेमकी कोणती नावे आहेत, हे स्पष्ट होणार आहे. पण सध्या सोशल मिडियातून चर्चेत असलेल्या नावांमध्ये नगर जिल्ह्यातून एकही नाव नाही.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी शिवाजीराव गर्जे या सुरुवातीच्या काळात चर्चेत असलेल्या जिल्ह्यातील दोन नावांसह ऐनवेळी चर्चेत आलेले नगर युवा सेनेचे विक्रम राठोड या तिन्ही नावांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अंतिम पसंती दिली नाही, हे आता पुढे आलेल्या नावांतून स्पष्ट होत आहे. अर्थात राज्यपाल व महाविकास आघाडी यांच्यातील सुप्त संघर्षात राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकीय नावांना राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो, या भीतीने जिल्ह्यातील नावांवर काट मारावी लागल्याचे दिसत असले तरी यानिमित्ताने कला-साहित्य क्षेत्रात काम करणारांना खूप वर्षांनी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात काम करण्याची मिळणारी संधीही नसे थोडकी, असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.

राज्यपाल नियुक्त आमदार व त्यांची नावे हा मागील महिन्यापासून राज्यात चर्चेचा विषय होता. नगर जिल्ह्यातून सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे व विक्रम राठोड अशी तीन नावे होती. सत्यजीत तांबे यांनी प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून नव्या पिढीत काँग्रेस विचार रुजवण्याचे केलेले कौतुकास्पद प्रयत्न त्यांना या आमदारकीच्या चर्चेत आणून गेले. पण आई दुर्गाताई तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्ष आहेत व वडील डॉ. सुधीर तांबे हे विधान परिषदेतच नाशिक पदवीधर मतदार मतदार संघाचे आमदार आहेत तसेच मामा बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. अशा स्थितीत एकाच घरात किती लाभाची पदे द्यायची, याचा विचार काँग्रेस श्रेष्ठींनी केला असावा, असेही आता बोलले जात आहे. तर शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक असून, राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे संघटनात्मक काम त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. पण त्यांचेही नाव तसे राजकीय क्षेत्रातूनच असल्याने बहुदा त्यावर फुली पडली असावी. तिसरे नाव नगरचे युवा सेनेचे विक्रम राठोड यांचे होते, त्यांचे वडील (स्व.) अनिलभय्या राठोड नगर शहराचे २५ वर्षे शिवसेनेचे आमदार होते व तब्बल ४० वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहून त्यांनी जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची कामगिरी केली आहे. अशा स्थितीत कोरोना काळात मागील ऑगस्टमध्ये त्यांचे निधन झाल्याने जिल्हा व शहर शिवसेनेला नेता राहिलेला नाही, अशा स्थितीत अनिलभय्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची मागणी दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह मनपातील शिवसेनेच्या काही निवडक नगरसेवकांनी केली होती. पण एकतर ही मागणी खूप उशिरा शिवसेना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली असावी व राज्यस्तरावर या मागणीला सेनेतील वरिष्ठांपैकी कोणीही लावून धरले नसावे, यामुळे राठोडांचे नावही कट झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे नगर जिल्ह्यातील तिन्ही नावे महाविकास आघाडी सरकारने बासनात गुंडाळून ठेवल्याने जिल्ह्याचा भ्रमनिरास झाला आहे. या यादीत नाव नसल्याने सत्यजित तांबेंनी 'श्रद्धा व सबुरी' हा साईबाबांचा मंत्र उच्चारून सोशल मिडियातून ही प्रतिक्रिया व्हायरल केली असली तरी त्यावरही आता टीकाटिपण्णी झडू लागली आहे. मात्र, राज्यपाल नियुक्त आमदारकी व त्या चर्चेतून जिल्ह्याचे राजकीय वजन राज्याच्या स्तरावर हळूहळू कमी होत असल्याचेही दिसू लागले आहे.

कलावंतांना मिळणार संधी
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये यंदा कलावंतांना संधी मिळणार असल्याचे दिसू लागले आहे. याआधी या आमदारकीचा बहुमान 'गीतरामायण'कार ग. दि. माडगुळकर, शिक्षण तज्ज्ञ ग. प्र. प्रधान, कवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ विचारवंत जयंत टिळक, वात्रटीकाकार रामदास फुटाणे आदींनी मिळाल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर यंदा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे व अनिरुद्ध वनकर अशा कलावंतांना या आमदारकीची संधी मिळणार असल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागा प्रत्येकी ४ शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा वाटून घेतल्या आहेत व या तिन्ही पक्षांनी आपल्या नावांमध्ये काही कलावंतांचा समावेश केल्याचे सांगितले जाते. ही संभाव्य नावे पक्ष निहाय अशी-राष्ट्रवादी- एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे व गायक आनंद शिंदे. शिवसेना - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर व चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेस - सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर.

Post a Comment

Previous Post Next Post