'त्यांच्या' शरीरातील 'त्या' विषाणूची पातळी तपासणार; नगरला मोफत मोहीम

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

एचआयव्ही-एडस झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील एचआयव्ही विषाणूची पातळी तपासण्याची विशेष मोहीम नगरमध्ये राबवली जाणार आहे. पुणे येथील नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल्स लिव्हिंग एच.आय.व्ही. या संस्थेमार्फत हा तपासणी उपक्रम मोफत राबवला जाणार आहे.

एचआयव्हीसह जगणार्‍या व्यक्तींच्या उपचारासाठी त्यांच्या शरीरातील एच.आय.व्ही. विषाणूंचे प्रमाण तपासणीसाठी व्हायरल लोड (डी.बी.एस.) ही चाचणी करावी लागते. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त ही चाचणी नगरच्या विहान काळजी व आधार केंद्रात मोफत केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे खजिनदार प्रशांत येंडे यांनी दिली. पुणे येथे नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल्स लिव्हिंग विथ एच.आय.व्ही. या संस्थेमार्फत ताल प्लस एकात्मिक आरोग्य केंद्र व कम्युनिटी फार्मशी चालविली जाते. ज्यामध्ये एच.आय.व्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना औषधामध्ये 30 ते 70% पर्यंत सवलत उपलब्ध करून दिली जाते. जे रुग्ण वेळच्या वेळी खासगी डॉक्टरांकडून व ताल कॉम्युनिटी फार्मसीमधून दर महिन्याला औषधे घेतात, अशा रुग्णानांसाठीच व्हायरल लोड तपासणी मोफत होणार आहे. एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरातील विषाणूची पातळी समजून त्यावर उपचार करावे लागतात. व्हायरल लोड तपासणी करण्यासाठी खासगी लॅबमध्ये सुमारे 4 हजार रुपयेपर्यंतचा खर्च येतो. त्यामुळे पुणे येथील नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल्स लिव्हिंग एच.आय.व्ही. या संस्थेमार्फत हा उपक्रम मोफत राबविण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यातील एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या रुग्णांनी विहान काळजी व आधार केंद्र (मीराचंद्रा अपार्टमेंट, झोपडी कॅन्टिन हॉटेलसमोर, सावेडी) या ठिकाणी सकाळी 11 ते 4 यावेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या व्यक्ती खासगी डॉक्टरांकडून किंवा ताल फार्मसीमधून औषधे घेतात, अशा व्यक्तींनीच या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-९५११२९१९१९.

Post a Comment

Previous Post Next Post