जामखेडच्या बागडेंचे रोहित पवारांना साकडे; कार्यालयासमोर उपोषणाचाही इशारा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''आपण मा. जाणता राजा श्री. शरद पवार साहेब यांचे नातू आहात... आम्ही अल्पसंख्याक समाजातील घटक असून आमच्यावर दादागिरी, दहशत व जबरदस्तीने आमची मालकी हक्काची जागा ताब्यात ठेवली गेली आहे, ते आम्हाला इशारे देत आहेत की, कोणीही आमचे काही करू शकत नाही व आमची पोहोच खूप वरपर्यंत आहे. तुम्ही कर्जत-जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आहात. त्यामुळे पक्षपातीपणा न करता आम्हाला न्याय द्यावा,'' अशा शब्दात जामखेड येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम बागडे यांचे चिरंजीव गौरव बागडे यांनी आ. रोहित पवार यांना साकडे घातले आहे. ''आमची जागा रिकामी करून द्यावी व आजपर्यंत संस्थेने शासनाकडून घेतलेले भाडे ते आम्हाला देण्यात यावे या मागणीसाठी बागडे पिता-पुत्र मा. आमदार रोहित (दादा) पवार यांच्या जामखेड कार्यालयासमोर 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता उपोषण करीत आहोत,'' असेही प्रशासनाला त्यांनी कळवले आहे.


यासंदर्भात गौरव बागडे यांनी सांगितले की, ''जामखेड तालुक्यातील खर्डा येथील माझ्या मालकी हक्काच्या जमिनीमध्ये श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ खर्डा, श्री संत गजानन महाराज महाविद्यालय खर्डा, श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा व प्रगती कला महाविद्यालय खर्डा ही महाविद्यालये माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या चालू आहेत. यासंदर्भात कोर्टातील न्यायालयीन लढाई जिंकूनही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नाही, त्यामुळे भारतीय दंड संहितेनुसार त्यांच्यावर फौजदारी-फसवणुकीचे गुन्हे दाखल करून सर्व शिक्षण संस्थांची मान्यता व संलग्नता तात्काळ रद्द करण्यात यावी व आमची स्वमालकीची जमीन वापरली त्याचे आत्तापर्यंतचे भाडे मिळावे,'' अशी मागणी बागडे यांनी केली आहे. दरम्यान, बागडे यांनी उपोषणाचे पत्र आ. रोहित पवारांनाही पाठवले असून, त्यात ''नगर जिल्हाधिकारी, जामखेड तहसीलदार व जामखेड पोलिस स्टेशन यांना आपण लेखी आदेश देऊन आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या व आमच्यावर अन्याय करणाऱ्यांवर कायदेशीर ठोस कारवाई कराल, अशी आशा व्यक्त केली आहे. आमच्या कुटुंबास उपोषणाच्या वेळी काही कमी-जास्त झाल्यास त्याला शासन जबाबदार असेल, याची कृपया दखल घ्यावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा,'' अशी मागणीही गौरव बागडे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post