काका, आम्हाला वाचवा.. अन्नत्याग आंदोलन करत बेरोजगार युवा अभियंत्यांचे ठाकरेंना साकडे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही वा ठेकेदारीने कामे करण्याची तयारी असली तरी बडे ठेकेदार व शासकीय अधिकारी संधी मिळू देत नाहीत, म्हणून नगरमधील काही बेरोजगार तरुण अभियंत्यांनी मंगळवारी येथील हुतात्मा स्मारकात लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.

हुतात्मा स्मारकाजवळील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करून अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबत सरकारचे लक्ष वेधले गेले. ''पैसे नसतात म्हणून इंजिनिअर मुले भाजी व फुले विकत आहेत, मोठे कॉन्ट्रक्चर अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या नव्या पोरांना कामे मिळू देत नाही, त्यामुळे उध्दव काका... आम्हाला वाचवा, आमची आर्त हाक ऐका. आम्ही अभियांत्रिकीची मुले आयुष्यातून उठण्याची वेळ आली आहे. काका... आम्हाला वाचवा,'' अशी विनवणी या आंदोलनातून करण्यात आली, अशी माहिती स्मायलिंग अस्मिता संस्थेचे प्रमुख यशवंत तोडमल यांनी दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते मंदिराच्याबाबतीत लगेच आगडोंब उठवतात आणि कष्टकरी शेतकरी विद्यार्थ्यांसाठी चकार शब्द काढत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात तोडमल यांच्यासह सचिन साप्ते, अक्षय खडके, अक्षय परभणे, धीरज कुमटकर, अक्षय पवार सहभागी झाले होते. फेसबुकवर हे आंदोलन लाईव्ह करण्यात आले. त्यात शुभम मिसाळ (कर्जत), ऋषिकेश दुसुंग व आसिफ शेख (पाथर्डी), वाहेद शेख (मुंबई) यांच्यासह बीड, लातूर, सांगली, कोल्हापूर, पुणे व औरंगाबाद येथूनही बेरोजगार अभियांत्रिकी युवक सहभागी झाले होते.

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील धीरज कुमटकर सिव्हील इंजिनिअर आहे, पण नोकरी नसल्याने घरच्या वीटभट्टीवर काम करतो...अक्षय परभणे हा इलेक्ट्रीक इंजिनिअर आहे व इलेक्ट्रीकची ठेकेदारीने कामे मिळण्यासाठी त्याने रजिस्ट्रेशन अर्ज केला आहे, पण तो लालफितीत अडकला आहे. नव्हे अडकवला गेला आहे... कारण...खावडी. नगर जिल्ह्यातीलच या दोन तरुण अभियंत्यांच्या कहाण्यांसारख्या राज्यभरातील तरुण अभियंत्यांच्याही कमी-जास्त प्रमाणात अशाच कहाण्या आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत, ठेकेदारीने काम करण्याची इच्छा असली तरी बडे ठेकेदार कामे आपसात वाटून घेतात व शासकीय अधिकारीही त्यांनाच साथ देतात. बेरोजगार अभियंत्यांना शासकीय कामे देण्याचा आदेश केवळ कागदावर आहेत, अशा अनेकविध त्रासाला कंटाळून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या शेतकरी मुलांनी मंगळवारी हुतात्मा स्मारकात लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काका, आम्हाला वाचवा अशी आर्त विनवणी केली आहे, असे तोडमल यांनी सांगितले. सिव्हील व इलेक्ट्रीकल अभियंत्यांना कामे घेण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून, त्यासाठी सुमारे ४० हजाराचा खर्च येतो. त्यामुळे हे रजिस्ट्रेशन व त्यासाठीचा अर्ज त्यांना मोफत मिळावे, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात होणारी विकास कामे त्याच गावांतील बेरोजगार अभियंत्यांद्वारे केली जावीत, असे अभियंते तेथे उपलब्ध नसतील तर तालुका व मग जिल्हास्तरावरील बेरोजगार अभियंत्यांना संधी दिली जावी, अभियांत्रिकी शिक्षणाचा व्यावसायिक दर्जा काढला जावा, जिल्हा परिषदेच्या विकास कामांचे ठेके देताना पाहणी अहवालाची अट रद्द केली जावी, बल्क कॉन्ट्रक्ट पद्धत बंद करून फ्रेशर्स अभियंत्यांना छोट्या-छोट्या रस्ते-गटारी-पथदिवे-खड्डे दुरुस्ती व अन्य अनुषंगिक कामांचे ठेके दिले जावेत, अशा विविध मागण्याही त्यांनी केल्या. नोकरी-व्यवसाय नसल्याने एमई झालेल्या विद्यार्थ्याने दिवाळीत फुले विकली, ३० हजाराची फुले त्याला २२ हजारात विकावी लागली व तोटाही झाला, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या करुण कहाण्या आहेत, राज्याचे शैक्षणिक व केंद्राचे आर्थिक धोरण विद्यार्थी हिताचे राहिलेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबद्दल राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, गोंडवना व नागपूर या सातही विद्यापीठांच्या कुलगुरूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत तसेच अन्यत्याग आंदोलनाची दखल घेतली नाही तर येत्या १ डिसेंबरला मुंबईत मातोश्रीसमोर आंदोलन करणार आहोत, असा इशारा तोडमल यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post