सराफाची लूट : 'त्या' मोटारसायकलने दिली तपासाला दिशा; १३ लाखाचे दागिने हस्तगत, पाच अटकेतएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सराफ व्यावसायिकांतील आपसातील स्पर्धेतून कर्जत तालुक्यात पाच दिवसांपूर्वी सराफ व्यावसायिकाची गुन्हेगारी टोळ्यांकडून लूटमार करण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे सुमारे १३ लाखाचे दागिने तसेच एक चारचाकी व दोन मोटारसायकली मिळून १८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लुटमारीची घटना घडल्यानंतर त्या परिसरातच एक संशयास्पद मोटारसायकल कापडाने झाकून ठेवलेल्या स्थितीत सापडली होती तसेच लुटमारीची घटना घडल्यानंतर काही तासांनी या मोटारसायकलीचा मालक त्याची गाडी चोरीस गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेला होता. त्या मोटारसायकलची काढलेली माहिती व त्या मालकाच्या चौकशीनंतर गुन्हेगारांच्या व्यावसायिक टोळीने लुटमार केली व त्यासाठी एका सोनारानेच व्यावसायिक स्पर्धेतून या लुटमारीची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मग विविध जिल्ह्यात लपून बसलेल्या टोळीतील पाचजणांना जेरबंद केले.

यासंदर्भातील माहिती अशी की, नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रहिवासी सराफ व्यापारी अतुल पंडित यांचे महिजळगाव येथील ज्वेलर्स शॉप आहे. 1 नोव्हेम्बर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दुकान बंद करून ते त्यांच्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी घातली तर पाठीमागून आलेल्या अन्य काही दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या व पंडित यांना मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या तीन बॅगा चोरून नेल्या. या घटनेबाबत कर्जत पोलिस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या लूटमारीच्या तपासासाठी दोन पथके केली होती. लुटमारीच्या घटनास्थळाजवळ संशयास्पद मोटारसायकल कापडाने झाकलेल्या स्थितीत सापडल्याने तसेच अन्य काही तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि व्यावसायिक स्पर्धेतून सुपारी देऊन ही लूटमार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी यवत (जि. पुणे) येथील सराफ व्यावसायिक गणेश माळवे याला अटक केली आहे. याने गुन्हेगारांना लुटीटी सुपारी दिल्याचे सांगितले जाते. त्याची सासूरवाडी डिक्सळ येथील असून, त्याच्या मेव्हण्याचे मिरजगावला सराफी दुकान आहे. पोलिसांनी माळवेसह अण्णा गायकवाड (राहणार वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे), संदेश उर्फ बाळा डाडर (राहणार लांगोर गल्ली, कर्जत), भारत उर्फ सागर साळवे (राहणार राशीन, तालुका कर्जत), अक्षय उर्फ बंटी धनवे (राहणार प्रेमदान हडको, नगर) व राम साळवे (राहणार राशीन, तालुका कर्जत) यांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये याअगोदर दरोड्याचे व चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी अण्णा गायकवाड याच्यावर उस्मानाबाद येथे तर भारत साळवे याच्यावर कर्जत येथे दोन गुन्हे दाखल आहेत तसेच अक्षय धनवे याच्याविरुद्ध बुलढाणा येथे गुन्हे दाखल आहेत.

सराफी व्यावसायिकाच्या लूटमार प्रकरणाची सुपारी देणाऱ्या यवतच्या सराफाच्या मिरजगाव येथील मेव्हण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखालील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्यासह पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, कर्जतचे सपोनि शिरीषकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, दत्ता गव्हाणे, बाळासाहेब मुळीक, मनोज गोसावी, संदीप पवार, सचिन अडबल, विशाल दळवी, दीपक शिंदे, प्रकाश वाघ, विनोद मासाळकर, कमलेश पाथरूड ,बबन बेरड, संभाजी कोतकर, सुनील खैरे ,कदम, काळे ,काकडे ,सुपेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी 113 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याची अंदाजे किंमत ५ लाख 76 हजार, तसेच 17 किलो वजनाची साडेआठ लाख रुपये किमतीची चांदी हस्तगत केली आहे. दरम्यान, अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी करणारांविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्याचे सुतोवाच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post