कोपर्डीच्या समाधानचा मृत्यू संशयास्पद; सीआयडी चौकशीची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

निर्भयावरील अत्याचार व हत्येच्या घटनेनंतर राज्यात व देशात चर्चेत असलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे समाधान रमेश शिंदे या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कर्जत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण त्याने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या केल्याचा दावा समाधानचा भाऊ बाळू रमेश शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे नगर शहराध्यक्ष प्रतीक बारसे यांनी केला आहे. त्यामुळे दोषींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा तसेच समाधानच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत बाळू शिंदे व प्रतीक बारसे यांनी दिलेली माहिती अशी की, समाधान शिंदे हा गणेश मोरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून अंबालिका साखर कारखान्यावर ऊस वाहतुकीचे काम करीत होता. त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर त्याने कारखान्याच्या यार्डात लावला होता व तो जेवायला गेला असताना १० नोव्हेंबरला हा ट्रॅक्टर चोरीस गेला. त्या चोरीचा आळ समाधानवर घेऊन काहींनी त्याला मारहाण केली, त्यानंतर त्याला राशीन पोलिसांच्या ताब्यात दिले गेले व तेथेही त्याला मारहाण झाल्याचा दावा शिंदे-बारसे यांनी केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला ट्रॅक्टर चोरीची तक्रार करणारांच्या ताब्यात दिले गेले. त्यानंतर अंबालिका कारखान्याजवळील जंगलात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणी समाधानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार बाळू शिंदे यांनी दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी गणेश मोरे व धनंजय गुंड (दोघे रा. नांदगाव, कर्जत) व काका सुद्रिक (रा. कोपर्डी, कर्जत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, समाधानच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झालाचा दावा शिंदे व बारसे यांनी केला असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३०२चा गुन्हा दाखल करावा तसेच समाधानला काही पोलिसांनीही मारहाण केली असल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करावा, समाधानच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी, पिडीत शिंदे कुटुंबाला व ते राहात असलेल्या वस्तीला पोलिस संरक्षण द्यावे, या प्रकरणातील फिर्यादी बाळू शिंदे यांना वैयक्तिक पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही शिंदे व बारसे यांनी केली आहे.

आमदार पवारांवर आरोप
अंबालिका कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आहे व या कारखान्याच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच समाधानला मारहाण केली आहे. तसेच कर्जतचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असून, त्यांनी अजूनही पिडीत कुटुंबाची भेट घेतलेली नाही तसेच राजकीय दबावामुळे पोलिसांनी या मृत्यूप्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलेला नाही. मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. आ. पवार यांच्यासह तालुक्यातील अन्य राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजकीय दबावामुळे या प्रकरणातील एकाही आरोपीला अजून अटक झालेली नाही, असा दावा शिंदे व बारसे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर कुटुंबातील सदस्य व बौद्ध समाजबांधवांसमवेत येत्या २२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून माझ्या कोपर्डी येथील राहत्या घराजवळच धरणे आंदोलन करणार आहे, असा इशारा बाळू शिंदे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post