कधीकधी वाटते हा रस्ता पाकिस्तानमध्ये तर नाही ना? नागरिकांचा उद्वेग सीमापार

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''शिर्डी व शनिशिंगणापूर या आंतरराष्ट्रीय देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या भारतीय नागरिकांना कोणी वाली राहिलेला नाही.. त्यामुळे कदाचित कधीकधी वाटते हा रस्ता पाकिस्तानमध्ये तर नाही ना...''.अशा उद्वेगजनक प्रतिक्रियेने नगर जिल्ह्यातील नगर-कोपरगाव रस्ता थेट पाकिस्तानमधला असावा, असे नागरिकांना वाटू लागले आहे व त्याचे कारण आहे, केवळ या रस्त्यावरील खड्डे. या रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांचा या खड्ड्यांमुळे होणारा संताप इतका आता पराकोटीला पोहोचण्याच्या मार्गावर आहे. वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने वैतागून थेट हा रस्ता सीमापार असलेल्या व आपल्या दुश्मन देशाचा तर नव्हे ना, असा सवाल विचारून केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अनोखा हल्लाबोल केला गेला आहे.

नगरमधील प्रथितयश उद्योजक व कोरोना काळात 'घर घर लंगर सेवा' उपक्रमाद्वारे मागील ८ महिन्यात तब्बल ४ लाखावर नागरिकांना रोज दोनवेळचे जेवण दानशुरांच्या मदतीने पोहोचवणारे हरजितसिंग वधवा यांनी नगर-कोपरगाव रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल पक्षविरहित जनआंदोलन सुरू केले आहे. नगर-कोपरगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या गावाच्या परिसरातील या रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो मोठ्या आकारात रस्त्याच्या कडेला लावून त्यावर काळा झेंडा लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सोशल मिडियातून हे आवाहन करताना त्यांनी या रस्त्याची दुरवस्था पाहता हा रस्ता पाकिस्तानातील तर नाही ना, असा सवाल केंद्र सरकार, वर्ल्ड बँक व राज्य सरकारला केला आहे. शिर्डी व शनि शिंगणापूरसारख्या आंतरराष्ट्रीय देवस्थानांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या भारतीय नागरिकांना कोणीही वाली राहिलेला नाही, त्यामुळे हा रस्ता पाकिस्तानातील आहे काय, असे वाटते, अशी तीव्र भावना व्यक्त करताना, या रस्त्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मंत्री-संत्री नेहमी जा-ये करीत असतानाही त्यांनाही या रस्त्याची दुरवस्था का दिसत नाही, असा सवाल केला आहे. देशात स्मार्ट सिटीचा बोलबाला होतो, पण नगर जिल्ह्यातील एक राष्ट्रीय महामार्ग भग्नावस्थेत असणे हा भारतीय नागरिकांचा अपमान आहे. या रस्त्यावर एमआयडीसी, कृषी विद्यापीठ, महाविद्यालये आहेत, जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहनांची वाहतूक या रस्त्याने होते. रस्त्यांतील खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. काहींना पाठीचे व मणक्याचे त्रास सुरू झाले आहेत, वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार, वर्ल्ड बँक व राज्य सरकार या रस्त्याच्या दुरुस्तीकडे का दुर्लक्ष करीत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, नगर-कोपरगाव महामार्गाची दुरवस्था दूर होण्यासाठी वधवा यांनी हाती घेतलेल्या पक्षविरहित जनआंदोलनात सहभागी होऊ इच्छिणारांनी ९४२३१६२७२७ यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी नगर-कोपरगाव या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मॅन व्हर्सेस वाईल्ड हा डिस्कव्हरी चॅनेलवर कार्यक्रम सादर करणारा कलावंत नगर-कोपरगाव रस्ता पार करण्याचे आव्हान स्वीकारणार असल्याची उपरोधिक पोस्ट व्हायरल होत होती. आता तर हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने तो पाकिस्तानातील आहे का, असा सवाल विचारून सत्ताधारी व प्रशासनाचे वाभाडे काढले गेले आहेत. प्रश्न आता फक्त या उद्वेगातून बोध घेतला जाणार आहे की नाही, याचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post