'नगर-मनमाड'च्या दुरवस्थेची सोशल मिडियातून खिल्ली

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यंदाचा पावसाळा संपून आता जवळपास महिना होत आला असला तरी रस्त्यांच्या दुरवस्था दूर होण्याला अजून मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोशल मिडियातून या रस्त्यांच्या दुरवस्थेची खिल्ली उडवली जात आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर मॅन व्हर्सेस वाईल्ड हा जगप्रसिद्ध शो करणारा कलावंत नगर-मनमाड रस्ता पार करून दाखवणार आहे व त्याचे लाईव्ह प्रक्षेपण डिस्कव्हरीवर दाखवले जाणार आहे, अशा आशयाचे मेसेज व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत व त्यांना स्माईलींच्या रुपाने जोरदार लाईक्सही मिळत आहेत. उपरोधिक स्वरुपातील या मिश्किल टिपणीने राज्य़ातील महाविकास आघाडीच्या सत्तेच्या व त्यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या लोकाभिमुख कारभारावर प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित होत आहे.

नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था मागील महिनाभरापासून चर्चेत आहे. त्यातल्या त्यात नगर ते राहुरी रस्ता व त्यातील खड्डे दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना जीवघेणे ठरत आहेत. अनेकांचे अपघात या रस्त्यांवर झाले आहेत व त्यात काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मध्यंतरी या रस्त्याने नेहमी प्रवास करावा लागणारांनी रस्ता दुरुस्त झाला नाही तर आगामी निवडणुकांतून मतदानच न करण्याची भूमिका जाहीर केली होती. पण तिचाही प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर फारसा परिणाम झाला नाही. रस्त्याची दयनीय स्थिती तशीच असल्याने अखेर या रस्त्याने प्रवास करणारांनी सोशल मिडियातून कोणाचेही नाव न घेता या रस्त्य़ाच्या दुरवस्थेची टर उडवली आहे. सोशल मिडियात नुकतीच यासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, ''अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी खुशखबर! डिस्कव्हरी चॅनलवरील प्रसिद्ध कार्यक्रम "मॅन व्हर्सेस वाईल्ड"मधील जगप्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रील्स हे नगर जिल्ह्यातील व जगातील सर्वात भयानक आणि खडतर रस्ता म्हणजे "नगर ते मनमाड" पार करण्याचे आव्हान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण डिस्कवरी चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. तरी सर्वांनी हा कार्यक्रम पाहण्याचा सुवर्ण लाभ घ्यावा व आपल्या आसपास जर कोणी असेल तर त्यालाही बघायला सांगा..''.अशा आशयाची ही पोस्ट व्हायरल होत असल्याने ती वाचणारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू फुलत आहे. हे हसू प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला दूषणे देणारे ठरू लागले आहे.

नगर-मनमाड महामार्गावरील टोल नाके असताना टोल नाका ठेकेदाराकडून याच काय, पण ज्या रस्त्यांवर टोल नाके आहेत, त्या रस्त्याची नियमित देखभाल-दुरुस्ती होत होती. पण नगर-मनमाड मार्गावरील टोल नाके मुदत संपल्याने बंद झाल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वखर्चाने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. सध्याच्या कोरोना काळामुळे शासन-प्रशासनाचा सार्वजनिक खर्चाचा प्राधान्यक्रम बदलला आहे. त्यामुळे महामार्गांची दुरुस्तीला निधी उपलब्धतेचेही आव्हान आहे. तसेच नगर-मनमाड महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत होऊन केंद्र सरकारद्वारे त्याचे सहा पदरी नूतनीकरण होणार असल्याचेही सांगितले जाते. मात्र, या रस्त्याचे राज्य सरकारकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे हस्तांतरण व नंतर या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू कधी होणार, याची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर-मनमाडच नव्हे तर नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांवरील खड्डे दुरुस्ती गांभीर्याने व प्राधान्याने करण्याची गरज आहे. सोशल मिडियातून महाविकास आघाडी सरकारचे सत्ताधारी व प्रशासनाची आता महामार्गांच्या दुरवस्थेवरून खिल्ली उडवली जाऊ लागल्याने त्याची दखल घेण्याची अपेक्षा जिल्ह्यातील मंत्र्यांकडून व पालकमंत्र्यांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post