पाऊस गेलाय...रस्ते दुरुस्त करा व पथदिवेही लावा; राष्ट्रवादीकडून मनपातील भाजप सत्तेला आवाहन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पावसाळा आता जवळपास संपला असल्याने खड्डेयुक्त झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच प्रमुख रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवेही तातडीने सुरू करावेत, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखरणा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावेडीतील पारिजात चौक व श्रीराम चौकातील बंद हायमास्टमुळे रात्रीच्या अंधारात नागरिकांना होणारा त्रास तसेच रस्त्यांतील खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचे होणारे हाल यांची माहिती व छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल केली आहेत. मनपात राष्ट्रवादीच्या पाठबळावर सत्तेवर असलेल्या भाजपला रस्ते दुरुस्ती व पथदिवे दुरुस्तीची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून होणे म्हणजे घरचा आहेर मानला जात आहे.

यासंदर्भात स्मिता पोखरणा यांनी निवेदनात म्हटले आहे की, सावेडीत गुलमोहर पोलिस चौकी ते श्रीराम चौक ते नित्यसेवा तसेच तांबटकर मळा, वीर सावरकर रोड, शासकीय विश्रामगृह मागील बाजूने येणाऱा गुलमोहर रस्ता भागात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. मनपाच्या सावेडी विद्युत विभाग अपुरे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे पुरेसे विद्युत साहित्य नाही. गेल्या अनेक दिवसापासून सावेडीच्या विविध रस्त्यांवरील पथदिवे, हायमॅक्स, हायमास्ट बंद आहेत. ते असेच बंद राहिले तर दिवाळी सण सावेडीकरांना अंधारात साजरा करावा लागणार आहे. सावेडीचा महापौर असतानाही पथदिवे दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

मांडल्या विविध व्यथा
पथदिवे बंदच्या विविध व्यथा पोखरणा यांनी मांडल्या आहेत. अनेक पथदिवे झाडाच्या फांद्यात हरवले आहेत, पण फांद्या तोडून पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पुरेसा पडेल यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होत नाहीत. रस्त्यांवर अंधार असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. जुने पथदिवे बदलून नवीन एलईडी पथदिव्यांचा बसविण्याची मागणी होत आहे. मनपाकडे पथदिवे दुरुस्ती साहित्य पुरेसे नाही. पथदिवे चालू-बंद करण्यासाठी असलेले फ्यूज बॉक्स सताड उघडेच असतात. सावेडी उपनगरांमधील अनेक भागातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्री परिसरात अंधार पसरलेला असून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तातडीने बंद असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करून ते सुरू करावेत. पथदिव्यांचे अनेक खांब गंजलेले आहेत. पथदिवे खांबांवर बेकायदा जाहिराती तसेच केबल वायर लोंबकळलेल्या असतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. काही भागातील पथदिवे कायम चालूच असतात. सावेडी उपनगरात पाच प्रकारचे पथदिवे आहेत. तरी आता एकच एलईडी पथदिवेची फिटिंग बसवावी व वीज बचत करावी. पाइपलाइन मुख्य रस्त्यावर पथदिवे फिटिंगवर धुळ साचल्याने खाली प्रकाश पड़त नाही. तरी पथदिवे फिटिंग धुवून स्वच्छ केली नसल्याने त्या पथदिव्यांचा जमिनीवर प्रकाश पड़त नाही, अशा विविध व्यथा त्यांनी मांडल्या असून, सावेडी भागातील नागरिकांची निराशा झाली आहे. महापालिकेला संकलित कराचा सर्वाधिक महसूल सावेडी भागातून मिळतो. पण खड्डे दुरुस्ती व पथदिवे दुरुस्ती वेळच्यावेळी या भागात होत नाही. पथदिवे व्यवस्थापन कोलमडले आहे, असा दावा करताना नागरिक नगरसेवकांकडे गेल्यास आलेला नागरिक आपला समर्थक आहे का व त्याने आपणास मतदान केले आहे काय, याचा विचार करूनच त्याच्या समस्येची दखल घेतली जाते, असा दावाही पोखरणा यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post