नगरचे राजकारणी होताहेत व्यावसायिक; पवारांचा घेतला आदर्श

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणी काय व्यवसाय करावा, याचे कोणावर बंधन नाही. पण काहींनी सवलतीत काही वस्तूंची विक्री सुरू केली की तो चर्चेचा विषय होतो. नगरच्या राजकारण्यांनीही आता दिवाळीनिमित्त सवलतीत पिठाची गिरणी, वॉटर फिल्टर व त्यावर मिक्सर फ्री...अशी स्कीम आपल्या समर्थकांच्या माध्यमातून सुरू केली आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मागील सप्टेंबर महिन्यात अशी सवलतीची स्कीम त्यांच्या समर्थकांनी कर्जत-जामखेडमध्ये राबवली होती. त्याचा आदर्श घेत नगरच्या राजकारण्यांनी दिवाळीनिमित्त अशी सवलत स्कीम हाती घेतल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. अर्थात सवलतीत गृहोपयोगी वस्तू व साहित्य मिळत असेल तर तो मतदारांचा आर्थिक फायदाच ठरणार आहे, शिवाय वस्तूमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधित राजकारण्याला धारेवर धरणे सोपे जाणार आहे. त्यामुळे मतदारांचे यात काही नुकसान दिसत नाही. तरीपण यानिमित्ताने नगरच्या राजकारण्यांचे राजकारणातील व्यवसायी रुप स्पष्ट झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

नगरमधील एका बड्या पक्षाच्या बड्या नेत्याच्या समर्थकांनी ५० टक्के सवलतीत घरगुती पिठाची गिरणी विक्रीची जाहिरात सोशल मिडियातून केली आहे. यात पिठाच्या गिरणीचे ग्लॉसी मॉडेल १६ हजाराचे फक्त ८ हजाराला, कोरियन ऑल इन वन मॉडेल १८ हजाराचे साडेनऊ हजाराला व कोरियन व्हॉल्वो मॉडेल २१ हजाराचे साडेदहा हजाराला देऊ केले आहे. त्याच्या वॉरंटीचाही उल्लेख यात आहे. नगरचा बडा राजकीय नेता व त्याचे आदर्श असलेल्या जिल्ह्यातील आणि राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह या स्कीमची जाहिरात सोशल मिडियातून असून नावनोंदणी करणारांना प्राधान्याने ही पिठाची गिरणी दिली जाणार आहे. या योजनेतून बड्या राजकीय नेत्याने आपल्या समर्थकांना रोजगार तर मिळवून दिला आहेच, पण मतदारांना निम्म्या सवलतीत पिठाची गिरणी दिली जात असल्याने त्यांच्यामध्येही या नेत्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. कोरोना काळात कामधंदे बंद असल्याने नोकरदार व मध्यमवर्गीयांची यंदाची दिवाळी तशी यथातथाच आहे. अशा स्थितीत काही घरगुती उपयोगाच्या वस्तू सवलतीत मिळत असतील तर त्यांना ते फायद्याचे ठरणारे आहे. त्यामुळे व्यावसायिक स्तरावरील अशा सवलत योजनांना नेहमी चांगला प्रतिसाद मिळतो. पण आता तर राजकीय नेत्यांकडून अशा सवलत योजनांसाठी पुढाकार घेतला जात असल्याने जनतेसाठी ते सोन्याहून पिवळे म्हणावे लागणार आहे. वस्तू खराब निघाली तर संबंधित राजकारण्याने फसवल्याची भावना जनतेमध्ये म्हणजेच मतदारांमध्ये जाणार असल्याने तशी भावना होऊ नये म्हणून नेतेमंडळीच आपल्या समर्थकांद्वारे दर्जेदार वस्तू जनतेला सवलतीत देतील, असा कयास आहे. कोरोना काळात अनेकांना रोजगार गमवावे लागल्याने राजकारण्यांनाही आपल्या समर्थकांच्या रोजीरोटीचा विचार करावा लागला. त्यामुळे दिवाळीनिमित्त त्यांनाही काही रोजगार या सवलत योजनेतून मिळवून देता आला तर राजकीय फायद्याचे ठरणार आहे. तसेच घरगुती वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही सात-आठ हजार संख्येसारखी बल्क स्वरुपात आपल्या वस्तूंना मागणी आली तर निम्म्या सवलतीतही त्यांना परवडू शकते. कोरोनामुळे तसेही धंदेपाणी मर्यादेत झाल्याने दिवाळीनिमित्त स्टॉक क्लिअरन्सची संधीही त्यांना यानिमित्ताने मिळणार आहे.

शहरातील एका बड्या नेत्याने सवलतीत पिठाची गिरणी देण्यास सुरुवात केल्याने या नेत्याच्या सावेडीतील काही समर्थकांनी (यात काही नगरसेवकही आहेत) सवलतीत वॉटर फिल्टर व त्यावर मिक्सर फ्री अशी अनोखी योजना सुरू केली आहे. यातून मतदारांचा डब्बल फायदा होणार आहे. १० हजाराचे वॉटर फिल्टर यात साडेसहा हजारात मिळणार तर आहे, शिवाय अडीच हजाराचे मिक्सरही चक्क फुकट पदरी पडणार आहे. त्यामुळे या स्कीमला सावेडीत जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चांगले चांगले म्हणवणारेही या स्कीमकडे आकर्षित झाले आहेत. या दोन योजनांची माहिती सध्या तरी सोशल मिडियातून फिरत आहे. यातून शहरातील व जिल्ह्यातील अन्य राजकारण्यांनी, नगरसेवकांनी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आदर्श घेतल्याचे ऐकिवात नाही. पण मतदारांना रिझवणारी व त्यांचा आर्थिक फायदा करवून देताना भविष्यातील निवडणुकांतून आपल्या हक्काच्या मतांची आतापासूनच बेगमी करणाऱ्या अशा स्कीम त्यांनाही आकर्षित करणार नसतील तर ते नवल ठरेल. त्यामुळे नववर्ष स्वागताला वा संक्रातीला त्यांच्या अशा योजना सुरू झाल्या तर ते नवल वाटणार नाही.

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी रोहितदादांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेडमध्ये मागील सप्टेंबरमध्ये अशी सवलतीत घरगुती वस्तू देण्याची स्कीम राबवली होती. त्यातही पिठाची गिरणी, विद्युत उपकरणे, टीव्ही, सोलर पॅनेल अशा विविध वस्तू होत्या. या दोन्ही तालुक्यांतील त्यांच्या समर्थकांनी व विविध छोट्या-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही स्कीम राबवून मतदारांना दिलासा देताना आपल्याविषयी व आपल्या नेत्यांविषयी त्यांच्या मनात चांगल्या भावना रुजवण्यात यश मिळवले होते. पण माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहितदादांच्या या व्यावसायिक राजकारणावर टीका केली होती. त्यावर रोहितदादांनी काही भाष्य मात्र केले नाही. पण त्यांच्या समर्थकांचा हाच सवलतीत उपयोगी वस्तू देण्याचा आदर्श बहुदा नगरच्या राजकारण्यांनीही घेतल्याचे दिवाळीतील या स्कीम्समधून दिसत आहे. मतदारांचा यात आर्थिक फायदा व वस्तूच्या गॅरंटीची राजकीय हमी असली तरी बड्या कंपन्यांसारखे राजकारण्यांचे हे व्यावसायिक रुप मात्र मतांच्या राजकारणाची नवी दिशा दाखवून जात आहे व म्हणून ते चर्चेचे झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post