एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्याची मागणी आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच केली आहे. वाळू व खडी वाहतुकीच्या डंपरमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने वाळू व खडी यासह अन्य गौण खनिजाच्या रॉयल्टीमधून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षाही पवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांबाबत...या विषयाच्या अनुषंगाने पवारांनी ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
यात म्हटले आहे की, नद्यांचे वाळू लिलाव व खडी क्रशर असलेल्या भागात रस्ते सातत्याने नादुरुस्त होत असतात. लोकांना वाळू,खडी,मुरूम ,क्रश सॅन्ड व डबर आदींची बांधकामासाठी आवश्यकता असते.परंतु ग्रामीण भागातील रस्त्याची क्षमता या वाहतुकीसाठी सक्षम नाही. त्यामुळे हे रस्ते वारंवार खराब होतात.या क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रॉयल्टीच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास होणार नाही, असे नमूद करून पत्रात पुढे म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार अडीच ब्रास पेक्षा जास्त जड वाहतूक ग्रामीण भागातील रस्त्यांवरून करण्यास परवानगी नसते.परंतु अडीच ब्रास वाहतूक वाहनमालकांना परवडत नसल्यामुळे ते जास्त अवजड वाहतूक करतात व त्यामुळे रस्ते खराब होतात आणि त्यांचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडतो. तसेच राष्ट्रीय महामार्गांना रस्ते तयार करताना, ज्या प्रकारची तरतूद असते, त्या प्रमाणात या भागातील रस्त्यांना तरतूद केल्यास रस्ते मजबूत होतील व जड वाहतुकीमुळे खराब होणार नाहीत.असा निर्णय झाल्यास रात्री-अपरात्री होणारी वाहतूक थांबेल व रस्ता अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही पवारांनी या पत्रात व्यक्त केला आहे.
Post a Comment