एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
दिवाळी भाऊबीजेनिमित्त ज्यांना परिवार किंवा भाऊ नाही, अशा वंचित महिलांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून माहेरची साडी देण्याचा उपक्रम यंदा येथील स्नेहालय संस्थेने हाती घेतला आहे. यंदा अशी माहेरची साडी साडे तीनशेवर महिलांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरमधील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी दीड दशकांपूर्वी माहेरची साडी हा उपक्रम सुरू केला आहे. वयोमानामुळे औटी गुरुजींना आलेल्या मर्यादा विचारात घेऊन यंदाच्या वर्षी स्नेहालय परिवाराने या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे. जाणीवसंपन्न नागरिकांच्या सहयोगातून यंदाही भाऊबीजेला वंचित भगिनींना हक्काची साडी त्यामुळे मिळणार आहे. अशा मानस भगिनींसाठी किमान एक साडी प्रायोजित करण्याचे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे. औटी गुरुजी या निवृत्त शिक्षकाने हा उपक्रम निष्ठेने राबवला. निवृत्ती वेतनातून ते स्वतः २० हजारांची मदत यासाठी दरवर्षी द्यायचे. नंतर समाजातील दानशूर भावाकडून आर्थिक सहयोग मिळवून प्रत्येक अनामिक बहिणीला अशी माहेरची साडी ते द्यायचे. यात साडीला आणि तिच्या किमतीला फारसे महत्त्व नव्हते. परंतु अनामिक भावांनी स्नेहालय परिवारामार्फत आपल्या बहिणींना दिलेल्या या साडीला भावनिक मूल्य मात्र प्रचंड होते. दिवाळीच्या काळात अशी मिळालेली साडी अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू देऊन गेली.
सावेडीतील भिस्तबाग चौकातील जगदंबा या कपड्यांच्या दुकानाचे संचालक शिवाजी चव्हाण या माहेरची साडी उपक्रमासाठी ना नफा-ना तोटा तत्त्वावर साड्या देतात. काही साड्या त्यांच्यातर्फेही सप्रेम भेट म्हणून या उपक्रमाला मिळतात. पुणे येथील स्नेहालयचे विश्वस्त पालक किरीटी श्यामकांत मोरे आणि महानुभाव पंथातील कार्यकर्ते राजेंद्र कपाटे यांनी या उपक्रमात खंड पडू नये म्हणून उत्स्फूर्त पुढाकार घेतला असून, नवीन १२० साड्यांसाठी त्यांनी आर्थिक सहयोग दिला. यंदा ३५० महिलांना माहेरची साडी देण्याचे उद्दिष्ट आहे. साधारणत: ३०० रुपयांची नवी साडी या उपक्रमातून दिली जाते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण मुत्याल, दीपक बूरम, अजित कुलकर्णी, मीना पाठक, यशवंत कुरापट्टी, शारदा गौडा, जया जोगदंड, संगीता शेलार, डॉ. प्रीती भोंबे आदी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमास संवेदनशील नागरिकांनी सहयोग देण्याचे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे. अधिक माहितीसाठी ९०११०२६४८५ किंवा ९०११११३४८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
Post a Comment