एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश; पगार नसल्याने हाल सुरू

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मागील तीन महिन्यांपासून झाला नसल्याने विविध कामगार संघटनांनी त्यासाठी आंदोलने केली, पण महाविकास आघाडी सरकारने त्याचीही दखल घेतली नसल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरासमोरच आक्रोश आंदोलन करून सरकारचा निषेध केला. दरम्यान, पगार मिळत नसल्याने एसटीच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार व दिवाळी बोनस देण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते.

कोरोना विषाणुच्या महामारीमध्ये एस.टी.कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात टाकून प्रवासी वाहतुकीचे आपले कर्तव्य बजावले आहे. कोरोनाची लागण झाल्याने एस.टी.च्या सुमारे 80 कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. तरीही एस.टी.कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांपासून पगार झाले नाहीत. तसेच दीपावलीनिमित्त बोनस देखील एस.टी.प्रशासनाने जाहीर केलेला नाही, याचा निषेध एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश आंदोलनातून केला. नगरमधील गजराजनगर येथील एस.टी.कर्मचारी उत्तम रणसिंग यांच्या घरासमोर राज्य संघटनेच्या आवाहनानुसार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी रणसिंग परिवारातील सदस्य, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव अकोलकर, पदाधिकारी शिवाजी कडूस, शंकर डहाणे उपस्थित होते.

इतर क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मात्र त्यांचे नियमित वेतन मिळत आहे, महापालिका, बेस्ट कर्मचार्‍यांना दिपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहेत. मात्र, एस.टी. कर्मचारी पगारापासूनही वंचित आहेत. कर्ज काढून घर चालविणे, पगर नसल्याने कुटूंबामध्ये सुरू असलेले कलह यामुळे कर्मचारी महामारीच्या संकटात सापडला असून, शासनाने तातडीने एस.टी.कर्मचार्‍यांचे वेतन द्यावे. अन्यथा, कर्मचार्‍यांमध्ये असलेल्या असंतोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा अहमदनगर जिल्हा एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव अकोलकर यांनी यावेळी दिला. वेतन कायदा व कामगार करारातील तरतुदीचा भंग केल्यामुळे मान्यप्राप्त संघटनेतर्फे एस.टी.प्रशासनाविरोधात औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post