एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर-वांबोरी रस्त्यावरील पिंपळगाव माळवी तलावाचा सांडवा 100 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. या सांडव्यावरून मागील काही महिन्यांपासून एक फुटापर्यंत पाणी वाहात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी याची देखभाल दुरूस्ती न केल्याने सांडव्याला खड्डे पडून या मार्गावरील गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वांबोरी, डोंगरगण, मांजरसुंबा, आढाववाडी, पिंपळगाव माळवी या गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणारा शेंडी-वांबोरी या प्रमुख जिल्हा मार्गाची दुरवस्था झाली आहे. जोरदार पावसामुळे पिंपळगाव माळवी तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहात आहे. तलावाच्या ओव्हरफ्लोचे पाणी पिंपळगाव माळवी येथील दगडी सांडव्यावरून वाहत आहे.
शंभर ते दिडशे मीटर लांबीचा हा सांडवा 1920 मध्ये ब्रिटिश कालावधीत बांधण्यात आला होता. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी देखभाल दुरूस्ती न केल्याने हा सांडवा खचला आहे. त्यामुळे सांडव्याला चार ते पाच फुट लांबी व दीड ते दोन फुटांचा चर पडला आहे. या मार्गावरून जाणारी वाहने दररोज त्यात अडकून अपघात होत आहेत. बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन दुरूस्ती न केल्यास हा मार्गच वाहतुकीस बंद होण्याची शक्यता आहे. रस्ता बंद झाल्यास या मार्गावरील चार ते पाच गावांचा संपर्क तुटणार आहे.
Post a Comment