नगरला होणारा पाणीपुरवठा दूषित? वसंत टेकडीच्या पाण्याच्या टाकीत पडतात कुत्री-मांजरी? शिवसेनेने केली चौकशी व दुरुस्तीची मागणी

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विळद जलशुद्धीकरण केंद्रातून नगर शहरासाठी येणारे पिण्याचे पाणी आधी वसंत टेकडी येथील जलकुंभात टाकले जाते व नंतर या जलकुंभातून (पाण्याची टाकी) शहरभरातील अन्य जलकुंभांकडे वितरित होते. पण वसंत टेकडीच्या मुख्य जलकुंभाची अवस्था सध्या दयनीय झाल्याचा दावा शहर शिवसेनेने केला आहे. जमिनीवर असलेल्या या जलकुंभाच्या चारही हौदांना झाकणे नाहीत, जलकुंभाचा स्लॅब कोसळून तेथे मोठमोठी खिंडारे पडली आहेत, त्यामुळे कुत्री-मांजरांसह इतर सरपटणारे प्राणी-पक्षी त्यात पडून पाणी दूषित होत आहे, त्यातच साफसफाईच्या नावाने बोंबाबोंब आहे व सर्वत्र चिखल, साठलेले पाणी, वाढलेली झाडे, झुडपी यामुळे येथे सर्वत्र अस्वच्छता पसरलेली असल्याने शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा शहर शिवसेनेने केला आहे. या जलकुंभाची तातडीने दुरुस्ती व्हावी व ती या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शहर शिवसेनेने केली आहे.

वसंत टेकडी येथील पाणी वितरण व्यवस्थेची शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर व नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पाहणी केली. त्यावेळी तेथील दुरावस्था पाहून या शिष्टमंडळाने तीव्र संताप व्यक्त केला. या जलकुंभातून पाणी उचलून ते तेथीलच उंच टाक्यांमध्ये टाकले जाते आणि तेथून ते शहराच्या विविध भागात नळाद्वारे पोहचवले जाते. परंतु या जलकुंभांची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. तसेच येथे एकही सुरक्षारक्षक नाही. याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

साथीच्या आजारांची भीती

दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिक जुलाब, उलट्या, पोटदुखीसारख्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. कोरोना काळात दवाखान्यापासून दूर-दूर राहणाऱ्या नागरिकांना दूषित पाण्यामुळे दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास शहरात साथीच्या आजाराचा मोठा फैलाव होण्याची भीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवणे महापालिकेचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. नगर शहराला स्वच्छतेबाबत थ्री स्टार मिळालेले असताना स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत मात्र प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे समोर येत आहे. वसंत टेकडी येथे पाण्याच्या स्वच्छतेबाबत महापालिका आयुक्त, महापौर, अधिकारी यांनी पाहणी करणे आवश्यक असून, तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना संभाव्य साथीच्या आजारापासून दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post