कामगारांचा एल्गार; येत्या गुरुवारी देशव्यापी संप

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केंद्र सरकारने नव्याने केलेले कामगार कायदे कामगारांच्या विरोधातील असल्याचा दावा करून देशभरातील विविध कामगार संघटनांनी येत्या गुरुवारी (२६ नोव्हेंबर) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. नगर जिल्ह्यातूनही हजारो कामगार यात सहभागी होणार आहेत.

शेतकरीविरोधी कृषि कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी २६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला २५० पेक्षाही जास्त किसान संघटनांनी पाठींबा दिला आहे. तसेच, नगर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी हमाल पंचायत, कामगार संघटना महासंघ, आशा कर्मचारी, पतसंस्था कर्मचारी यासंपामध्ये सहभागी होणार असल्याचे हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सागितले. या आंदोलनात मार्केट कमिट्या बरखास्त करण्याचा कायदा रद्द करावा,माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करावी,माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागण्यांसाठी माथाडी कामगार सहभागी होणार आहेत तर पतसंस्था कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी पतसंस्था कर्मचारी आंदोलनात सामील होणार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा, कायम स्वरूपी कामांमध्ये कंत्राटीकरणाला मज्जाव करा या मागण्यांसाठी संपात सहभागी होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रावसाहेब निमसे यांनी दिली.

तसेच नगर शहरात एमआयडीसीमध्ये सरकारी कामगार हॉस्पिटल निर्माण झाले पाहिजे, कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे, चार श्रम संहिता रद्द करा या मागण्यांसाठी औद्योगिक कामगार या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत, असे कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे यांनी सागितले. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी २६ ला ग्रामीण भारत बंद पुकारला आहे. यामध्ये किसान संघटना सहभागी आहे, असे अ‍ॅड बंन्सी सातपुते यांनी सांगितले.

या आंदोलनात औद्योगिक कामगारांसह बिडी कामगार, आयटक व इंटक संघटना सहभागी होणार आहेत. तसेच आयटक मधील ग्रामपंचायत कर्मचारी, आशा व गट प्रवर्तक,अवतार मेहरबाबा,मोहटादेवी व पतसंस्थेतील कर्मचारी, शेतकरी, शेत मजूर, विद्यार्थी, कामगार,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,अंगणवाडी अर्धवेळ स्त्री परिचर,आशा कर्मचारी आदी सर्वच समाज घटक सहभागी होणार आहेत, असे सुभाष लांडे यांनी सागितले.

Post a Comment

Previous Post Next Post