वाढते प्रदूषण : आजाराचा धोका टाळण्यासाठी करा 'हे' उपाय..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

देशभरातील दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढत आहे. अनेक शहरात शुद्ध हवेचा दर्जा आणि स्तर ढासळला आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे अनेक रोगांचे संक्रमण झपाट्याने पसरते. वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यालाही धोका असतो. या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे रोग वेगाने फैलावतात. तसेच प्रदूषणाचा फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होतो. मात्र, काही सोपे उपाय केल्यास प्रदूषण आणि त्यापासून होणाऱ्या रोगांपासून आपण आपला बचाव करत फुफ्फुसांना तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने होत असते. सकाळी आल्याचा चहा घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कर्करोगापासून बचाव करण्यासाठीही आल्याचा चहा पिण्याचा फायदा होतो. आल्याचा चहा घेतल्याने फुफ्फुसांचे आरोग्यही चांगले राहते. आल्याप्रमाणेच दालचिनीचा चहादेखील आरोग्याला फायदेशीर आहे. दररोज दालचिनीचा चहा घेतल्यास पचनप्रक्रिया सुधारत असल्याचे दिसून आले आहे. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात दालचिनी टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे, त्यामुळे फुफ्फुसांची तंदुरुस्ती वाढते. थंडीच्या दिवसात आल्याचा आणि दालचिनीचा चहा घेतल्याने फायदा होतो.

वाफ घेणे हा फुफ्फुसांच्या शुद्धतेसाठी सर्वात चांगला उपाय आहे. दररोज वाफ घेतल्याने फुफ्फुसांची आणि श्वसन मार्गाची शुद्धता होते. तसेच श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते. वाफ घेतल्याने नाक चोंदणे, कफ यासारख्या समस्या कमी होतात. वाफ घेतल्याने फुफ्फुसात असलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात वाफ घेतल्यास फैलावणाऱ्या साथीच्या रोगांपासूनही बचाव होतो. श्वासाशी संबंधित कोणत्याही समस्येवर वाफ घेणे हा रामबाण उपाय आहे.

आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. तसेच दररोज प्राणायाम केल्यास श्वसनक्रिया सुधारते. तसेच श्वास धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. प्राणायाम केल्याने कफ साचत नाही. तसेच साचलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. फुफ्फुसांची कर्यक्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम चांगला उपाय आहे. अल्पावधीतच याचे फायदे दिसून येतात.

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले असते. फुफ्फुसांसाठी हे उपयोगाचे आहे. दररोज अक्रोडचे सेवन केल्यास फुफ्फुसांच्या समस्येपासून सुटका होते. श्वासोश्वासाची समस्या असल्यास किंवा दम्याच्या आजार असल्यास अक्रोडचे सेवन केल्याने फायदा होतो. त्याचप्रमाणे ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या माशांचे सेवनही फुफ्फुसांसाठी लाभदायक आहे. शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक कडधान्यातून मिळातात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करावा.

आरोग्यासाठी फळे खाणेही फायदेशीर आहे. दररोज एक सफरचंद खाल्ल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. सफरचंदात असलेले विटामीन शरीराची तंदुरुस्ती कायम ठेवतात. सफरचंदाच्या सेवनाने फुफ्फुसांनाही फायदा होतो. सफरचंदाप्रमाणे विटामीन आणि इतर जीवनसत्त्वे असलेल्या फळांच्या सेवनानेही फायदा होतो. त्यामुळे आहारात आणि जीवनशैलीत बदल केल्यास प्रदूषणापासून होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post