एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अधात्माशिवाय माणसात बदल होऊ शकत नाही. अध्यात्म माणसाला बदलू शकते, याच्यावर माझा विश्वास आहे. मात्र, मंदिर उघडताना राजकारण करू नये. बीअरबार उघडले, चित्रपटगृह उघडलीत, रेल्वे सुरू झाली मग मंदिरे का उघडली जात नाहीत? असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.
एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना हजारे यांनी मंदिरे उघडण्यात राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भाविक व वारकऱ्यांनीही मंदिरे उघडण्यावरून सरकारवर टीका केली आहे. भाजपनेही यासाठी आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर आता हजारे यांनीही मंदिरे उघडण्याची मागणी केल्याने सरकार त्याची तरी दखल घेते की नाही, याची उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याबाबत महाविकास आघाडीने सुतोवाच केले आहे. त्यामुळेच आता मंदिरांचा विषय ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.
हजारे यांनी या मुलाखतीत त्यांची कथित निवृत्ती, लोकपाल कायदा, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम, सत्ता व पैशांचे राजकारण यावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाष्य करताना सरकारवर टीकाही केली. मी गेल्या 40 वर्षांपासून आंदोलन करीत आहे. यातून माहितीचा अधिकार, लोकपाल आणि दफ्तर दिरंगाई यासारखे 10 कायदे देशाला दिले. माहिती अधिकारातील कलम क्रमांक 4 ची अंमलबजाणी सरकार करत नसल्याने काही लोक याचा गैरफायदा घेतात, असा दावाही त्यांनी केला. आजचे राजकारण ध्येयवादी राहिलेले नाही. नेत्यांमध्ये दूरदृष्टी, सामाजिक दृष्टीकोन नाही. आता फक्त सत्ता आणि पैसा यासाठी राजकारण सुरू आहे, असाही दावा करून अण्णा म्हणाले, लाखो लोकांचे बलिदान राजकारणी विसरले आहेत. सध्याच्या राजकारणातून सेवाभाव दूर गेला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. वयाच्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन समाजसेवेचे व्रत मी माझ्या आयुष्यात स्वीकारले आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत गाव, समाज आणि देशाची सेवा करणार आहे, असे सांगून ते म्हणाले, दसऱ्याच्या ग्रामसभेत मी नवीन कार्यकर्ते पुढे येत असल्याने त्यांच्यावर जबाबदारी टाकणार असल्याचे म्हणालो. मात्र, समाज कार्यातून मी मुक्त होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशा प्रकारचा कारभार चालला असल्याची टीका हजारे यांनी केली आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्रे लिहिली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कोणाचेही उत्तर आले नाही. कोरोना परिस्थितीनंतर आपण पाहू असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी पाठवले आहे, असे अण्णांनी सांगितले. पण, हा कायदा जर आणला नाही तर मी पुन्हा आंदोलन करणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
Post a Comment