घंटा घणाणली अन देव मंदिरात आले...


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बलिप्रतिपदेच्या भल्या पहाटे काकड आरती सुरू झाली आणि मंदिरांतील घंटा घणाणू लागली तसे देवांचे पुन्हा मंदिरांतून आगमन झाले. मागील ७-८ महिन्यांपासून कुलूपबंद असलेल्या मंदिरांची कवाडे उघडली गेली आणि भाविकांनी गाभारा भरून गेल्याचे पाहून देवांचाही ऊर भरून आला. कोविड काळात भाविकांविना क्वारंटाईन अवस्थेत असलेल्या देवालाही दिवाळीत भाविकांचे दर्शन घडले. पण आता यानिमित्ताने झालेली भाव-भक्तीची भेट भविष्यातही नित्यनेमाने होण्यासाठी मास्क-सॅनिटायझेशन-सोशल डिस्टन्सिंग अशी काळजी घेणे भाविकांसाठी तरी गरजेचे झाले आहे.

कोविड काळात मंदिरे बंद असली तरी डॉक्टर, पोलिस, परिचारिका, सफाई कामगार, सीमेवर लढणारा सैनिक अशा विविध रुपात देव समाजात होता. निराधार व गरजवंतांना दोनवेळचे अन्न पुरवणारे, त्यांना या सेवेसाठी किराणा, भाजीपाला, गॅस, स्वयंपाकाची भांडी, धान्य, मिठाई देणारेही देवच होते... या यादीत डॉक्टरांचा उल्लेख आहे, पण काही डॉक्टरांनी कोविड काळ ही संधी मानली व लुटालूट केली, अव्वाच्या सव्वा पैसे रुग्णांकडून घेतले, मग ते देव कसे? असा सवाल काहींचा असू शकेल, पण तेही देवच होते व आहेत. फक्त आलेला रुग्ण बकरा समजून त्याच्या आर्थिक लुटालुटीचा विचार करताना त्यांच्यात दानव शिरला होता. सागर मंथनाच्यावेळी जसे अमृत प्राशन करण्यासाठी दानव राहू-केतू देवांची रुपे घेऊन देवांच्या पंगतीत बसले होते व त्यांनी अमृत प्राशन केल्यावर विष्णूने सुदर्शन चक्राने त्यांचा वध केला होता, असे धार्मिक ग्रंथांतून सांगितले जाते, तसे आता प्रशासनानेही विष्णूचे रूप घेऊन काही डॉक्टरांमध्ये शिरलेला दानव दंडात्मक व कायदेशीर कारवाईने मारला पाहिजे, अशा डॉक्टरांविरुद्ध वसुली कारवाई कठोरपणे करून ज्यांच्याकडून जादा पैसे घेतले, त्या रुग्णांना ते परत मिळवून दिले पाहिजे. तसे झाले तर हे डॉक्टरही देवरुपात पुन्हा पूजनीय होतील व प्रशासनातीलही देवत्व प्रत्ययास येईल.

''कोठे शोधीशी रामेश्वर अन कोठे शोधीशी काशी.. हृदयातील भगवंत राहिला उपाशी''.. किंवा ''शोधीशी मानवा राऊळी-मंदिरी...नांदतो देव हा आपुल्या अंतरी''...अशा गाण्यांतून माणसातच देव असतो असे जरी सांगितले जात असले तरी आणि देव मंदिरात असतो की नसतो हा वादाचा विषय असला तरी मंदिरातील देव अनेकांना जगवतो, हे निखळ सत्य आहे. पार्किंग, हार-फुले-प्रसाद, यात्रा-जत्रा, फळे-वस्तू विकणारे, मंदिरांतील चपरासी, सुरक्षा गार्ड, देवांचे पुजारी, सफाई कर्मचारी, मंदिराचा जीर्णोद्धार करणारा गवंडी आणि त्याचे सहकारी, मंदिरांत येणाऱ्या भाविकांना गंध लावणारी मुले आणि देवदर्शनानंतर क्षुधाशांती करणारी छोटी-मोठी हॉटेल्स व त्यांचे मालक-कर्मचारी...या सर्वांना जगवणारी व्यवस्था म्हणजे मंदिर. ग्रामदेवता वा मंदिरांच्या यात्रा-जत्रांच्या निमित्ताने आप्तस्वकियांच्या होणाऱ्या भेटीगाठी, एकमेकांची ख्यालीखुशाली व होणारी विचारपूस, यात्रा-जत्रांच्या मिरवणुका व आनंदोत्सव, यानिमित्ताने वाहने, कपडे, फॅशन, फोटो, वस्तू, गृहोपयोगी साहित्य-खेळणी विकणारे यावर जगतात. मागील ७-८ महिन्यांपासून त्यांची रोजीरोटी बंद होती, पोटपाण्यासाठी त्यांना शासनाची मदत स्कीम मात्र आली नाही. अशांनाअन्न पुरवण्यात काही संस्था पुढे आल्या, या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणारा व त्यासाठी या संस्थांना आवश्यक साहित्य पुरवण्याचा विचार दानशुरांना देणाराही देवच होता.

मंदिरे उघडावी की नाही, यातही वाद झाले. आंदोलने झाली. यानिमित्ताने देवाचे राजकारणही झाले व राजकारणात सारे क्षम्य असते, असे मानून हे सर्व सोडून देणेच इष्ट. भाविकांनी यंदा गुढीपाडवा, श्रीरामनवमी, गणेशोत्सव, नवरात्र-दसरा घरीच केला व स्वआरोग्याची प्रार्थना देवाकडे केली. अशा घरीच असणारांना देवानेही आरोग्य दिले, पण काही काम नसताना 'मला काही होत नाही', अशा अहंकारात बाहेर फिरणारांना करोना प्रसाद व पुढे क्वारंटाईनची शिक्षाही दिली. आता देव मंदिरात आला असला तरी रोज माझ्याकडे येण्याचे त्याचे आवतन नाही. रस्त्याने दुचाकी वा चारचाकीतून जाताना रस्त्यातील मंदिर पाहून आपण जसे दुचाकीच्या अॅक्सिलेटरवरील वा चारचाकीच्या स्टेअरिंगवरील हात काढून आधी डोक्याला व मग हृदयाला लावतो आणि मनोमन देवाला नमस्कार करतो, तसे त्याला आताही चालणार आहे, किंबहुना मला असाच नमस्कार कर, असाच त्याचा भाविकाकडे आग्रह असणार आहे. तोंडाला मास्क लाव, मंदिरात जाताना हात सॅनिटाईज कर, मंदिरात देवाच्या मूर्तीजवळ जाण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी व रेटारेटी करू नको, तेथे सोशल डिस्टन्स पाळ, असेच देवाचे नक्की सांगणे असेल. असे नाही केले तर करोना प्रसाद पदरी पडेल, नाहीतरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सारेच वर्तवत आहेत. ती थोपवणे आपल्याच हाती आहे. 'देह देवाचे मंदिर' समजून आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची मानसिकता ही आयुष्यभराची भेट करोनाने दिली आहे. या भेटीला ताकद देण्याचे काम मंदिरातील व हृदयातील देव नक्कीच करणार आहे. अन्य धर्मीयांचे सण असल्याने मंदिरे उघडल्याच्या टिपणी सोशल मिडियातून व्हायरल होत असल्या तरी त्यात राजकारणाचा भाग आहेच. भाविक ते काय व आपण काय, सारेच सारखे म्हणायचे व यापुढे माणसातील देव शोधायला महत्व द्यायचे. अडचणीच्यावेळी आपल्यासाठी धावून येईल, अशी माणसे जोडायचे प्रयत्न हवेत. ही माणसांची जोडाजोडी पैशाने होत नाही तर माणुसकीने होते. आपणही कोणाच्या अडचणीत धावून गेलो तर आपल्या अडचणीत आपल्याला मदत मिळते, म्हणून प्रत्येकाने आपल्या हृदयात माणुसकीच्या देवाची प्रतिष्ठापना करणे व या देवाची नित्य पूजा करणेच महत्त्वाचे राहणार आहे. मंदिरातील देवही यासाठी नक्की साथ देईल.

मंदिरांचे सरकारीकरण, दानपेटीतील पैशांचे राजकीय फायद्यासाठी विनियोग, मंदिरातील घोटाळे, उत्सव काळातील लुटालूट, यात्रा-जत्रा काळात विश्वस्त मंडळींची मनमानी, व्यावसायिकांकडून जादा भावाने लुटालूट नेहमीची असते. त्यावेळी वाटते देव या दानवांना शिक्षा का करीत नाही व मग आठवते, कृष्णानेही शिशुपालाचे 100 अपराध होण्याची वाट पाहिली होती, त्यामुळे देवही बहुदा या दानवांचे अपराध पूर्ण होण्याची वाट पाहत असावा... असे समजून स्वतःची समजूत काढणे व देवावरील श्रद्धा कायम ठेवणेच इष्ट.

Post a Comment

Previous Post Next Post