देशातील 5 राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजणार

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर 2021 मध्ये देशातील पाच राज्यांत निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यासह एकूण पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असून यामध्ये तामिळनाडु, केरळ, आसाम आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे. बिहारमध्ये एनडीएने बाजी मारली असून आता इतर राज्यांमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

पश्चिम बंगाल - विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यात भाजपने ममता बॅनर्जींच्या सरकारला आव्हान दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 211 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या.

आसाम - एप्रिल 2021 मध्ये आसामच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने आसाममध्ये 60 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. तर पिछेहाट झालेल्या काँग्रेसला फक्त 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत आहे.

केरळ - राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. 2021 मध्ये 140 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप राज्यात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. गेल्या कित्येक वर्षांपासून भाजप केरळमध्ये धडपडत आहेत. 2016 च्या निवडणुकीत एलडीएफला 91 जागा मिळाल्या होत्या. तर 47 जागा युडीएफने जिंकल्या होत्या.

तामिळनाडू - सध्या एआयडीएमकेची सत्ता असलेल्या तामिळनाडुमध्ये 234 जागांसाठी मे 2021 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. तामिळनाडुत प्रमुख लढत अण्णाद्रमुक आणि डीएमके यांच्यात आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला 136 तर डीएमकेला 89 जागा मिळाल्या होत्या.

जम्मू काश्मीर - कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच 2021 मध्ये निवडणुका होतील. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार लडाख वेगळं केल्यानंतर जम्म आणि काश्मीरच्या जागा 87 वरून 83 इतक्या झाल्या आहेत. यामध्ये लेह, कारगिल, झन्स्कार, नुब्रा या जागांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post