'त्या' क्लिपची चौकशी सुरू; अवैध कामांशी संबंधित पोलिसांवर कारवाईचे सुतोवाच


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड व पोलिस कर्मचारी गर्जे यांच्या बहुचर्चित संवादाच्या त्या ऑडियो क्लीपची चौकशी सुरू आहे. या क्लीपसंदर्भातील प्राथमिक अहवाल पोलिस महानिरीक्षकांना पाठवला आहे व आता सखोल चौकशी सुरू आहे, दोषींवर कारवाई होणार आहे, असे सुतोवाच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, अवैध व्यवसायाला चालना देणारे वा अशा व्यवसायांशी संबंध असलेल्या पोलिसांवर योग्य व कडक कारवाई केली जाणार आहे, अशा कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

कर्जत येथील सराफ व्यावसायिकाच्या लूटमारीच्या घटनेतील आरोपी पकडल्यानंतर त्यांची माहिती देण्यासाठी पोलिस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही त्यांनी माहिती दिली. प्रलंबित असलेले गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे तसेच नगर शहरातील बनावट डिझेल घोटाळा प्रकरणातचा तपास पूर्ण झाला असून यामध्ये प्रथमदर्शनी तीन जणांची नावे समोर आली आहेत. लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे प्रलंबित आहेत, हद्दीत गुन्हे वाढल्याचे दिसू नये म्हणून अनेक गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत. त्यामुळे उशिरा दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल त्यांना दाखल होण्यास उशीर का झाला, याचे कारण संबंधित पोलिस अधिकाऱ्याला द्यावे लागणार आहे. तसेच दाखल गुन्ह्यांचा तपास प्रलंबित का राहिला याचेही उत्तर देणे बंधनकारक असल्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तसेच या महिन्याअखेरपर्यंत सर्व प्रलंबित गुन्हे हे दाखल करण्यात यावेत व यापुढे दिरंगाई चालणार नाही, असे सांगितले आहे. जिल्ह्यामधील अनेक घटनांचा तपास प्रलंबित असूनस तो सुद्धा केला जाईल, कोणतेही गुन्हे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले. पोलीस संख्याबळ जेथे कमी आहे, तिथे आहे त्या पोलिसांमध्ये कसे चांगल्या पद्धतीने काम करून घेता येईल यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अप्पर पोलिस अधीक्षक राठोड व पोलिस कर्मचारी गर्जे यांच्या ऑडियो क्लीपमध्ये माल-अवैध धंदे व अनुषंगाने संवाद असल्याने ही क्लीप चांगलीच गाजली आहे. या प्रकरणाचा तपास खुद्द पोलिस अधीक्षक पाटील करीत आहेत. त्यांनी याबाबत सांगितले की, अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिपसंदर्भामध्ये अहवाल वरिष्ठांकडे दिला आहे, पुढील चौकशी मी स्वतः करीत आहे. अनेकांची चौकशी या प्रकरणासंदर्भात केली अजून काहींची चौकशी होणे बाकी आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, नगर शहरातील व जिल्ह्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अनुभवी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post