मांसाहाराच्या तुलनेत शाकाहाराचे फायदे व तोटे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जगातील लोक अनेकविध कारणांनी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेले आहे, पण यातील एक मुद्दा मात्र प्रत्येक पार्टीत, समारंभात आणि व्यावसायिक मेजवान्यांमध्येही कायमच वादविवादाचा ठरतो, चो म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा. सध्याच्या काळातत लोक आपण काय खातो यासोबतच आपले खाणे कुठून येते याबद्दलही सतर्क होत आहेत आणि यामुळे अनेक लोक शाकाहारी आहार हा मांसाहारापेक्षा अनेक बाबतीत चांगला असल्याचे सांगत शाकाहाराकडे वळत आहेत.

शाकाहारी आहाराचे अनेक फायदे

हृदयाचे आरोग्य - असे मानले जाते आणि अनेक अभ्यासांमधून सिद्धही झाले आहे की मांसाच्या, खासकरून लाल मांसाच्या सेवनाचा वाईट परिणाम हृदयावर होतो. याच्या उलट फळे आणि भाज्या असलेल्या आहारामुळे हृदयविकाराच्या झटक्याची जोखीम कमी होते. पण हृदयाच्या आरोग्यासाठी शाकाहार हा मांसाहारापेक्षा चांगला आहे हे सिद्ध करणारा काहीही सबळ पुरावा उपलब्ध नाही.

उत्तम रोगप्रतिकारक शक्ती - शाकाहाराचा महत्वाचा भाग असलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्व क आणि ड मुबलक प्रमाणात असते तसेच झिंकसारखी खनिजेही असतात. यामुळे असे म्हटले जाते की शाकाहारामुळे इन्फेक्शन्सची भीती कमी होते.

कर्करोग - अनेक संशोधनांमधून पुढे आले आहे की मांसाहारामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते, तर काही अभ्यासांनी असे सांगितले आहे की शाकाहारी लोकांना या आजाराचा धोका कमी असतो. पण या दोन्हीमधील फरक फारसा मोठा नाही.

टाईप २ मधुमेह - संशोधनाने सांगितले आहे की वनस्पतीयुक्त आहार टाईप २ मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. फळे, भाज्या, दाणे, बिया यांमधील मुबलक तंतूमय पदार्थ यात महत्वाची भूमिका बजावतात.

कमतरतेची जोखीम - शाकाहारातील खाद्यपदार्थ हे खूप पौष्टिक असले तरी काही पोषक पदार्थ मात्र मांसाहारातच मुबलक प्रमाणात असतात. यात जीवनसत्व ड, ब १२ आणि इतरांचा समावेश होतो. जर आपण कडक शाकाहारी असाल तर या पोषकघटकांची कमतरता शरीरात होण्याची शक्यता असते. यामुळे शरीरातील काही संस्थांवर परिणाम होऊन आजार होण्याची शक्यता असते.

प्रथिनांचे स्रोत अपूर्ण - प्रथिने ही आयुष्याचा महत्वाचा भाग म्हणून ओळखली जातात. हाडे आणि स्नायूंची वाढ, विकास होण्यासाठी आणि शरीराची झीज भरून निघण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते. पण शाकाहारामध्ये शुद्ध प्रथिनांचे स्रोत फारच कमी असतात, त्यामुळे शाकाहार हा खरेच आरोग्यपूर्ण आणि पुरेसा असतो का हा प्रश्न उभा राहतो.

सप्लिमेंट्सची गरज - शाकाहाराला काही काळानंतर शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी इतर सप्लिमेंट्सची आवश्यकता भासते. ही गरज पूर्ण न झाल्यास पोषणाचा अभाव शरीरात निर्माण होऊ शकतो.

निसर्गपूरक - शाकाहार हा तुलनेने अधिक निसर्गपूरक असतो. कारण हा प्राण्यांपासून मिळणारे आहारपदार्थ कमी करतो आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतो. 

शाकाहार हा आरोग्यपूर्ण असला तरीही त्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे फक्त इतर लोक करत आहेत म्हणून एखादी आहारपद्धती स्वीकारण्याआधी आपली जीवनशैली, आरोग्य आणि इतर गोष्टी लक्षात घेण्याची गरज असते. ज्यांना हा बदल करणे शक्य आहे त्यांनी जरूर करावा, पण एक समतोल आहार घेण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. ज्यामध्ये सर्व आहारगटांचा समावेश असेल आणि जे आपल्याला आरोग्यपूर्ण राहण्यास आणि सर्व पोषकतत्वे मिळण्यास मदत करतील.

(या लेखातील टिप्स आणि सल्ले हे सामान्य माहितीसाठी आहेत. याकडे व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आपल्या आहारात काहीही बदल करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Post a Comment

Previous Post Next Post