मिठाई भेसळयुक्त तर नाही ना? अशी करा मिठाईची पारख..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सध्या सणासुदीला घरात फराळांचे खमंग बेत रंगले आहेत. सोबत गोडाधोडाचं म्हणून मिठाई आवर्जून खाल्ली जाते. पण, या दरम्यान भेसळीलाही उधाण आलेलं असतं. बऱ्याचदा मिठाईत वापरल्या जाणाऱ्या खव्यात किंवा तुपात भेसळ असते. मिठाई घरी बनवण्याचा बेत केला तरीही हा धोका असतोच. त्यामुळे तुम्हाला अस्सल मिठाई आणि भेसळ केलेली मिठाई ओळखता यायला हवी.

भेसळ केलेली मिठाई खाल्ल्या पोटाचे त्रास उद्भवू शकतात. काहींना अन्नातून विषबाधा होऊ शकते. उलट्या, पोटदुखी असेही त्रास होतात. भेसळ केलेला खवा खाल्ल्याने किडनी, यकृत अशा अवयवांना धोका उत्पन्न होऊ शकतो. तुमच्या पचनक्रियेलाही त्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात.

कशी ओळखावी मिठाईतील भेसळ?

1. अस्सल तुपाचा सुगंध
मिठाई जर साजूक तुपात बनवली असेल, तर तुपाचा वास खाताना येतो. त्यासाठी मिठाईचा छोटा तुकडा चिमटीत पकडून मळा आणि थोडावेळ चिमटीत पकडून ठेवा. त्यानंतरही जर तुपाचा वास तुमच्या बोटांवर असेल, तर समजून जा की ती मिठाई साजूक तुपात बनवली आहे.
 

2. खव्याचा दर्जा-
मिठाईसाठी जो खवा लागतो, तो चांगल्या प्रतीचा असावा लागतो. ते ओळखण्यासाठी खव्याचा छोटा तुकडा हातावर घेऊन कणकेच्या गोळ्याप्रमाणे मळा. जर त्या गोळ्याला कुठेही चीर जात असेल, तर त्या खव्यात भेसळ असते. शुद्ध दुधाचा खवा हा मळल्यानंतर इतका एकजीव होतो, की त्याच्या गोळ्यात कुठेही चीर नसते.

3. खव्याचा रंग
नकली खवा ओळखण्याचा आणखी एक मार्ग आहे. पाच मिलिलीटर पाणी गरम करून त्यात तीन ग्रॅम खवा टाका. थोडावेळ हे मिश्रण थंड होऊ द्या. मग त्यात आयोडिन सोल्युशन टाकून पाहा. जर खव्याचा रंग निळसर झाला तर तो निश्चितच भेसळयुक्त खवा आहे.

4. खव्याचा पोत
खवा किंवा मिठाई ही एकसंध पद्धतीने तयार केलेली असली तरी तिचा घास घेतल्यानंतर काही अपवाद वगळता ती सुटी होते. पण जर मिठाई किंवा त्यासाठीचा खवा नकली असेल तर ही मिठाई सुटी न होता दाताला चिकटते.

5. खव्याचे तुकडे पडणे
खव्याची मिठाई बनवताना एक छोटा तुकडा पाण्यात टाका आणि फेटायला सुरुवात करा. जर तुमचा खवा एकजीव न होता तुटून तुकडे होत असतील तर तो खवा शिळा आहे. शिळ्या खव्याची मिठाई तुमच्या प्रकृतीला हानिकारक आहे.

6. मिठाईसाठी जर तुम्हाला खवा घ्यायचा असेल तर कच्च्या ऐवजी तुम्ही बेक केलेला खवा घेऊ शकता. याने तुमच्या मिठाईचा स्वादही वाढतो आणि बेक केलेला खवा लगेच खराब होत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post