निरोगी आयुष्यासाठी आहार कसा असावा, जाणून घ्या..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अन्न आणि आहार तसे जुनेच पण अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. म्हणूनच सुदृढ, निरोगी राहण्यासाठी काय खावे, किती खावे, केव्हा खावे, कोणी किती खावे, असे असंख्य प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. अन्न हे फार प्रभावशाली अस्त्र निसर्गाने आपल्या हाती दिले आहे. आपल्या शरीराचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी या पूर्णब्रह्माचा उपयोग होतो, तसेच शरीरावर आक्रमण करणाऱ्या जीव-जंतूंचा संहारही याच्याच सहाय्याने करता येतो. म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती कार्यरत रहाते.

आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवींचे पदार्थ असतात. या प्रत्येक चवीचा आपल्या खाण्यात समावेश असावा. एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते.

अन्नामुळे जीवन घडते तर पोषक अन्नामुळे उत्तम आणि सर्वार्थाने स्वस्थ असे मानवी जीवन घडते. तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तित्व घडते. तुम्ही काय खाता, यापेक्षा तुम्ही काय खात नाही, हे महत्त्वाचे ठरते.

शरीराला अवयवांची हालचाल करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, इतकेच नव्हे तर हृदयाचे स्पंदन वा फुप्फुसाचे श्वासोच्छ्वासाचे काम पार पाडण्याकरितासुद्धा ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पोषक पदार्थामधील कबरेदके आणि स्निग्ध पदार्थ यासाठी उपयोगी पडतात. थोडय़ा प्रमाणात प्रथिनांचाही ऊर्जा निर्मितीसाठी वापर होतो. या पदार्थाचे शरीरात ज्वलन झाल्यावर जी ऊर्जा निर्माण होते तिचा वापर शरीराच्या सर्व कार्यपद्धतींमध्ये आणि अवयवांच्या हालचालींमध्ये होतो.

मानवी शरीर अनेक पेशींचे बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना या पेशी आकाराने वाढतात तसेच नवीन पेशींची भरही त्यात पडत असते. या सर्व क्रियाप्रक्रियेत जीर्ण पेशींचा ऱ्हास होत असतो. रोजच्या चलनवलनादरम्यान, ताणतणावांमुळे दररोज असंख्य पेशी यादरम्यान कामी येत असतात. त्यांची जागा नवीन पेशींच्या सैन्याने भरून काढणे आवश्यक असते. यालाच शरीराची अंतर्गत डागडुजी म्हणतात. यासाठी प्रथिने अत्यावश्यक असतात.

आजच्या स्पर्धेच्या, ताणतणावांच्या आणि प्रदूषणाच्या जगात आत्मविश्वासाने, उत्साहाने आगेकूच करायची असेल तर शरीर निरोगी ठेवावे लागेल. आहार संतुलित हवा. किमान ४० अन्नघटक आहारात असावेत. धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल तुपातून ते मिळतील. अन्न खाताना ते फक्त पोट भरणारे असू नये तर शरीर, मन, बुद्धी हे सर्व पोसणारे हवे. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुख्यत्वे पोषकतत्वांची गरज असते. भरपूर भाज्या, फळे, अंकुरित द्विदल दूध, दही, ताक यातून ती पूर्ण होऊ शकते.

सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या. दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असणे महत्त्वाचे.

संतुलित आहारात विविध प्रकारच्या अन्नाचा समावेश असतो. तीन वेगवेगळ्या प्रकारचे अन्न त्याच्या कार्यानुसार प्रत्येक वेळच्या जेवणात निवडले जाते.

अन्नाचे वर्गीकरण असे :

ऊर्जा देणारे अन्न - कबरेदके व स्निग्धता असलेले पदार्थ

कबरेदकांचे स्रोत - 
धान्य : तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी
कंदमुळे : बटाटे, रताळी, सुरण, साखर, गूळ, मध.

स्निग्धता असलेले स्रोत - 
साय, तूप, लोणी, तेल, वनस्पती तूप, चीज.
(दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल बिया व मांसाहारी पदार्थ. यामध्येही चरबीचे प्रमाण जास्त असते)

शरीर वाढीचे अन्न - प्रथिनयुक्त स्रोत जसे की दूध व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, तेलबिया, मांसाहारी पदार्थ

संरक्षण व शरीर नियमन करणारे अन्न - 
अनेक जीवनसत्त्वे जसे अ, ब, क, ड, ई, के व खनिजांचे कॅल्शियम, फोस्फोरस, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, तांबे, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम यांचे स्रोत.

फळे - आंबा, पपई.
लिंबू वर्गातील आंबट फळे - संत्री, मोसंबी.
इतर फळे - पेरू, केळी, नासपती, पीच, आलुबुखार वगैरे.
भाज्या - हिरव्या पालेभाज्या : पालक, मेथी, चौळी, माठ, शेपू ई.
पिवळ्या केशरी भाज्या : भोपळा, गाजर, टोमटो
इतर भाज्या : भेंडी, वांगी, फुलकोबी, पानकोबी, शेंगा, तोंडली ई.

शरीराचा व्यापार सुरळीत चालण्यासाठी ४०-४५ अन्नघटक रोज लागतात हे सिद्ध झाले आहे. दिवसभरात विभागूनच शरीराचे व्यापार सुरळीत चालण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा काम करतात. उत्तम दर्जाची प्रोटिन्स, कॅल्शियम, जीवनसत्व अ, जोडीला इतर क्षार आणि जीवनसत्वे महत्त्वाची आहेत. तसे पाहता संपूर्ण ४० अन्नघटकाचीच गरज असते. यामधील फॅटी अॅसिड त्याच्या नैसर्गिक सिस रूपात असणे महत्त्वाचे आहे. हे केवळ तेलबिया आणि घाणीच्या तेलातूनच मिळू शकते. प्रक्रिया केलेले रिफाइन्ड, कोंडा नसणारे पदार्थ आपली शरीराला मारक ठरू शकतात.

अशा प्रकारचा आहार जर आपण आपल्या रोजच्या जीवनात समाविष्ट केला तर नक्कीच आपण आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले बनवून चिंतामुक्त आयुष्य जगू शकतो.

स्त्रोत : आरोग्यम धनसंपदा
(कोरा या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. वैद्यकीय सल्ला घेउनच उपचार करावेत.)

Post a Comment

Previous Post Next Post