कोरोना उपचार : बुथ हॉस्पिटलचे 5 कोटी थकले?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या इव्हॅनजेलिन बुथ हॉस्पिटलचे पैसे देण्याची मागणी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेने केली आहे. ही रक्कम सुमारे ५ कोटी असल्याचे समजले.

ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने येथील चंद्रकांत उजागरे, पास्टर बन्यामीन काळे व पिंपरी-चिंचवड विभागाचे अध्यक्ष डेव्हीड काळे यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. बुथ हॉस्पिटलने साडेतीन हजारावर कोविड रुग्णांना नियमित उपचार करून व्याधीतून बरे केले आहे. उपचारादरम्यान एकही रुग्ण दगावणार नाही, याची काळजीही घेतली आहे. तसेच रुग्णांकडून उपचाराचे कोणतेही शुल्क घेतलेले नाही. त्यामुळे बुथ रुग्णालयाची ही सेवा निश्चितच दखलपात्र आहे. त्यामुळे शासकीय स्तरावरील तरतुदीनुसार जे अर्थसहाय या रुग्णालयास मिळायला हवे होते, ते आजपर्यंत काहीही मिळालेले नाही. अशा स्थितीत जनसामान्यांनी या रुग्णालयास मदतीचा हात दिला आहे. रुग्णांची सेवासुश्रुषा करताना कदाचित त्यात व्यस्त असल्याने काही तांत्रिक बाबी करायच्या राहून गेल्याने बुथ हॉस्पिटला पैसे न देणे योग्य होणार नाही. रुग्णालयाने केलेल्या रुग्णसेवेचे वास्तव नाकारणे श्रेयस्कर नाही, असा दावा ख्रिस्ती विकास परिषदेच्या निवेदनात करण्यात आला आहे. मनपाकडे या पैशांसंदर्भात संपर्क साधूनही सकारात्मक काही घडत नसल्याचा खेदही परिषदेने व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने शासकीय तरतुदीनुसार बुथ हॉस्पिटलला पैसे दिले पाहिजे तसेच श्रीरामपूरच्या सेंट लुक हॉस्पिटलनेही कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याने त्यांनाही जिल्हा प्रशासनाने शासकीय तरतुदीनुसार पैसे द्यावेत, अशी मागणीही परिषदेने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post