भारतातून येणाऱ्या परदेशी नागरिकांना चीनमध्ये प्रवेशबंदी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी असून करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. ३ नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.

करोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरुपाचा असेल असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनासंबंधी परिस्थितीप्रमाणे पुढील निर्णय घेतले जातील असं चीनने निवेदनात सांगितलं आहे.

हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे. भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी आहे. याशिवाय फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post