US Election : जो बायडन यांचा विजय, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा अवघं एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मत्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडनच होतील यात काही शंका नाही. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं आहे. CNN ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान हा निकाल समोर येताच जो बायडन यांनी पहिलं ट्विट करुन अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवलं हा मी माझा बहुमान समजतो असंही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही मला मत दिलं असो की नसो मी सगळ्या अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगलं काम करणार या आशयाचं वाक्यही बायडन यांच्या ट्विटमध्ये आहे.

जो बायडन आता अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत सुरुवातीला अत्यंत चुरशीची झाली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत जो बायडन यांनी आघाडी घेतली तेव्हा तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालंच होतं. आता अमेरिकेच्या जनतेनेही त्यावरच शिक्कामोर्तब केलं आहे.

जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया या दोन राज्यांमध्येही जो बायडन हेच आघाडीवर असल्याने ते जिंकले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तेच शपथ घेतील असं वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील.

असोसिएडेड प्रेस अर्थात AP नेही हेच म्हटलं आहे की अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडन असतील. जो बायडन यांना २० इल्कट्रोल व्होट्स मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण इलेक्ट्रोल मतांची संख्या २६४ वरुन २८४ झाली आहे. हा निकाल लक्षात घेता जो बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील यात काहीही शंका नाही असंही AP ने म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post