खासगी डॉक्टरांनाही दिली जाणार कोरोना लस


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने ही लस आल्यानंतर प्रथम प्राधान्य शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना म्हणजेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य सेवकांना असणार आहे. यातून खासगी डॉक्टरांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने यावर आक्षेप घेत खासगी डॉक्टरांनाही या मोहिमेत समाविष्ट करण्याची मागणी करून पाठपुरावा केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आता खासगी डॉक्टरांनाही लस दिली जाणार असल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

मागील आठ महिन्यांपासून देशात कोरोनाचा उपद्रव सुरू आहे. अशा स्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लसची प्रतीक्षा आहे. यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. लवकरच ऑक्सफर्डची कोरोना लस देशात उपलब्ध होणार असल्य़ाने ती उपलब्ध होण्याअगोदर लसीकरण मोहीमेचा आराखडा तयार केला जात आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारद्वारे देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा केली जात आहे. या लसीकरण मोहिमेत कोरोना योद्ध्यांना अर्थात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य यंत्रणेतील इतर सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. लस आल्यानंतर प्रथम त्यांना ती टोचवली जाणार आहे. त्यानुसार केंद्राने सर्व राज्याला आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने सर्व सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने सरकारी आणि खासगी अशा सर्व डॉक्टरांचा लस देण्याच्या मोहिमेत समावेश केला आहे. मात्र, राज्याने खासगी डॉक्टरांना वगळले होते. यामुळे राज्यातील अडीच लाख खासगी डॉक्टर लसीकरण मोहिमेपासून दूर राहण्याची शक्यता होती. त्यामुळे आयएमए महाराष्ट्रने यावर आक्षेप घेतला व सर्व खासगी डॉक्टरांना लसीकरण मोहिमेत सामावून घेण्याची मागणी केली होती. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. नुकतीच आरोग्य विभाग आणि आयएमए महाराष्ट्र यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली व या बैठकीत आयएमए महाराष्ट्रची मागणी मान्य करण्यात आली आहे. लसीकरणासाठी आता सर्व खासगी डॉक्टरांची माहिती जमा केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post